बोईसर: चिल्हार-बोईसर रस्त्यावरील ललोंढे गावच्या हद्दीत सूर्या नदीवरील जुन्या पुलाखाली बंधाऱ्यालगत नदीपात्रात अतिक्रमण करण्यात आले आहे.  येथे दगडी कुंपणाचे बांधकाम सुरू असून माती भरावामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. मात्र पाटबंधारे विभाग आणि महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिल्हार बोईसर रस्त्यावर ललोंढे गावच्या हद्दीत सूर्या नदीवर तीन पूल बांधण्यात आले आहेत. जुन्या पुलाच्या खालच्या बाजूने नदीपात्रात काही मीटर अंतरावर एमआयडीसी परिसरासाठी  पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधलेला आहे. बंधाऱ्याच्या पाणी साठय़ापासून काही फूट अंतरावरच हे बांधकाम सुरू आहे.  माती भरावाच्या कामात ललोंढे गावच्या फुलाचा पाडय़ाच्या स्मशानकडे जाणार रस्ता बुजवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

नदीपात्रातील माती भराव आणि बांधकामामुळे पावसाळय़ात पात्रालगतच्या गावांना नदी पुराचा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी नदीपात्र आणि पात्रापासून काही मीटर अंतरावर बांधकामास मनाई करण्यात आली असताना नदीपात्रात बिनदिक्कत बांधकाम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सूर्या नदीपात्रातील बांधकामप्रकरणी पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांना विचारणा केली असता बांधकामाची माहिती घेतो असे सांगितले.

दरम्यान सूर्या नदीपात्रात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे. नदीपात्रात सुरू असलेले बांधकाम आणि भरावप्रकरणी तहसीलदारांसोबत चर्चा करून संबंधित जागा मालकाला नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे (मनोर) उपविभागीय अभियंता,  संदीप सारगर,  यांनी सांगितले.

पूररेषा निश्चिती

सूर्या नदीपात्राची पूर रेषा निश्चितीचे काम पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. पूर रेषा निश्चितीनंतर नदीपत्रातील अतिक्रमणांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.