पालघर : रामनवमी पासून तीन दिवस चालणाऱ्या सातपाटी येथील जत्रेची तयारी अखेरच्या टप्प्यात असून उद्यापासून (६ एप्रिल) जत्रेला सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने जत्रेकरिता लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आरोग्य, वीजपुरवठा, पाण्याची व्यवस्था, शौचालय आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. तसेच जत्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सातपाटी येथील रामनवमीची जत्रा हि पालघर जिल्ह्यामध्ये महत्त्वाची जत्रा मानली जाते. दरवर्षीप्रमाणे रामनवमी पासून सुरु होणारी जत्रा यंदा ६ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान संपन्न होत आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून जवळपास चार ते पाच लाख नागरिक तीन दिवसीय जत्रेकरिता येत असतात. त्यामुळे सुव्यवस्था चोख राहावी तसेच गर्दीचा फायदा घेउन गैरवर्तन व चोरी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांकरिता सोयी सुविधा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा आवश्यक बंदोबस्त जत्रा परिसरात ठेवण्यात आला आहे.
यात्रेदरम्यान ३० ते ४० खेळण्याचे स्टॉल व ५० ते ६० खाद्यपदार्थाचे व इतर वस्तूंचे स्टॉल जत्रेत मांडण्यात येणार आहेत. मांडण्यात येणाऱ्या जवळपास १०० हूनअधिक स्टॉलकरिता आगाऊ बुकिंग पूर्ण झाले असून दुकानदारांनी सामानांची मांडणी करण्यास सुरुवात केली आहे. मंदिराला केलेली रोषणाई, खाद्यपदार्थ व मिठाईचे दुकान, खेळणी, शोभेच्या वस्तू, गृहोपयोगी, सजावटी, कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. तसेच मोठमोठाले पाळणे, चलाखीचे खेळ यांनी तंबू उभे केले आहेत. जत्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असून यामुळे स्थानिकांना रोजगार देखील मिळत असतो.
उन्हाचे प्रमाण वाढले असून त्या अनुषंगाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाण्याची व शौचालयाची व्यवस्था करण्यात आली असून विजेची सोय व आरोग्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने बागायतदारांनी आपल्या माळ्या व ग्रामपंचायतीने मैदान पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
एसटी प्रशासनही भाविकांकरिता सज्ज
तीन दिवस चालणाऱ्या या सातपाटी जत्रेकरिता वाढत्या भाविकांच्या अनुषंगाने पालघर आगारातून पाच अतिरिक्त बस सुरू करण्यात आल्या आहेत. यासह दैनंदिन चालणाऱ्या पालघर सातपाटी २२० फेऱ्या देखील सुरू राहणार आहे. त्यामुळे दुपारपासून पहाटे उशिरापर्यंत चालणाऱ्या या जत्रेमधून भाविकांना परतण्यासाठी तीन दिवस या बस सतत फेऱ्या करणार आहेत.
श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम
श्रीराम नवमी निमित्त सातपाटी येथील श्रीराम मंदिर संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये हरिनाम सप्ताह सुरू असून या सप्ताह दरम्यान अभिषेक, कीर्तन, पालखी, होम, हवन, याग व भाविकांकरिता महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
तीन दिवसीय यात्रेसाठी पोलीस प्रशासन
सज्ज झाले असून यामध्ये वाहतूक पोलीस, होमगार्ड असे तैनात करण्यात आले आहेत. तसेच बस, पार्किंग, जत्रेमध्ये लावण्यात येणारे पाळणे व इतर खेळण्यांच्या साहित्याची तपासणी पूर्ण झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता अग्निशामन दल, ॲम्बुलन्स, औषध प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे. -योगेश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, सातपाटी