डहाणू : डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी जत्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून १२ एप्रिल पासून जत्रेला सुरुवात होणार आहे. जत्रेच्या नियोजनासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून मंगळवार १ एप्रिल रोजी जत्रेतील सोयीसुविधा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुका प्रशासनाकडून स्थानिक प्रशासनाला विविध सूचना देऊन सोयीसुविधा आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आली.

हनुमान जयंती पासून सुरू होणाऱ्या जत्रेसाठी मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या मंदिर परिसरात रंगरंगोटी, दर्शन रांगांसाठी मंडप, पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा, सुरक्षा रक्षक, सीसीटिव्ही कॅमेरे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामपंचायत मार्फत जत्रेत स्वच्छता आणि पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

जत्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत असून मुख्य रस्त्यावर होणाऱ्या गर्दीच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेची दुकाने सुरक्षित अंतरापर्यंत ठेवण्याची सूचना देण्यात आली. तसेच यावेळी आरोग्य, पाणी, विद्युत पुरवठा, वाहनतळ, प्रवासी वाहतूक, अग्निशामक उपाययोजना आदी. विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

महालक्ष्मी जत्रेमध्ये दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणी टंचाई समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावात कायम स्वरुपी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी दिली. यासाठी धामणी किंवा कवडास धरणातून पाणी विवळवेढे पर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच जत्रेमध्ये एकाच वेळी हजारो नागरिक येत असून कच्ची दुकाने थाटण्यात येत असून खाद्य पदार्थ आणि इतर व्यवसायांसाठी आगीचा वापर होत असल्यास त्याठिकाणी अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जत्रेसाठी पंचायत समिती मार्फत पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता आदी. सुविधा देण्यात येणार आहेत. डहाणू नगरपरिषद आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मार्फत अग्निशामक दल तैनात असणार आहेत. डहाणू नगरपरिषद मार्फत फिरते शौचालय आणि घंटागाडी उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच पोलीस प्रशासनाकडून जत्रेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यात येणार असल्याची माहिती डहाणू चे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड आणि कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अविना मांदळे यांनी दिली.

जत्रेमध्ये दुकाने घेऊन येणाऱ्या दुकानदारांना परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले असून विना परवाना दुकाने लावणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत तालुका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. जत्रेचे मुख्य आकर्षण असलेले आकाश पाळणे आणि इतर करमणुकीच्या पाळण्यांचे तज्ज्ञांमार्फत तपासणी करून त्यांना परवानगी देण्याची अट यावेळी ठेवण्यात आली. तसेच जत्रेत स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टीने प्रत्येक दुकानात कचरा पेटी ठेवण्याची सूचना देण्यात आली.