पालघर : राज्यात सत्तास्थानी असलेल्या घटक पक्षांमध्ये चलाओढ सुरू असून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी देखील अशीच रस्सीखेच सुरू आहे. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे दोन जनता दरबार झाल्यानंतर ९ एप्रिल रोजी शिवसेनेचे (शिंदे) संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातर्फे लोकदरबारचे आयोजन करण्यात आले आहे.

१९९९- २०२४ दरम्यानच्या आमदारकीच्या कारकिर्दीत तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ संपण्याच्या टप्प्यावर पालघरमध्ये जनता दरबारचे आयोजन केले होते. मात्र निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाण मंत्री पदापासून दूर राहिल्याने पालघरच्या पालकमंत्रीपदी गणेश नाईक यांची नेमणूक झाली. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या काळात झालेल्या जनता दरबारात उपस्थित समस्यांचा पाठपुरावा सविस्तरपणे घेणे शक्य झाले नव्हते.

पालकमंत्री गणेश नाईक यांनी २० फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या पहिल्या जनता दरबारात उपस्थित ८४२ तक्रारींपैकी ६२२ तक्रारी सुटल्याचा दावा त्यांनी २८ मार्च रोजी झालेल्या जनता दरबारात मार्गदर्शन करताना उल्लेखित केले होते. तर त्यांच्यामार्फत आयोजित केलेल्या दुसऱ्या जनता दरबारात ९३३ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र व्यस्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यापैकी ४००- ४२५ अर्जांवर प्रत्यक्ष भेट अथवा सुनावणी होऊ शकली होती.

ज्यावेळी जनता दरबारात कोणीही तक्रारदार येणार नाही तो प्रसंग सरकारच्या कार्यक्षमतेची पोहोच पावती दर्शवणारा असेल असे गणेश नाईक यांनी प्रतिपादन केले होते. मात्र जनता दरबार मध्ये उपस्थित समस्या योग्यरित्या सोडवण्याऐवजी शासकीय व्यवस्था त्यांना उत्तर देऊन वेळ मारून देत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत.

दरम्यान परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचल्याचे खातरजमा करण्याच्या दृष्टीने शिवसेनेचे संपर्क मंत्री प्रकाश सरनाईक यांनी ९ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता पालघरच्या नियोजन भवन येथे लोक दरबारचे आयोजन केले आहे. याप्रसंगी नागरिकांकडून उपस्थित केल्या जाणारे प्रश्न थेट सोडवण्यावर प्रयत्न केला जाईल असे सांगण्यात आले.

तर सेनेचे सरनाईक…

राज्यात सत्तास्थानी असणाऱ्या भाजपा व शिवसेनेत सर्व अलबेला असल्याचे भासवले जात असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ असल्याचे दिसून येते. शिवसेनेचे संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांच्यामार्फत आयोजित केलेल्या लोकदरबारात सर्व विभागांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्याची तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कारकीर्दीत अवलंबलेली पद्धत अमलात आणली जाईल असे शिवसेनेच्या स्थानीय नेत्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान पालघर जिल्हा मुख्यालय लगत परिवहन विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालयासाठी जागा मंजूर झाली असून पालघर येथे परिवहन कार्यालय सुरू करण्याबाबतचा प्रश्न या लोकदरबारात निकाली काढू असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी लोकसत्ता शी बोलताना सांगितले. तसेच कुंभवली येथे कामगार रुग्णालयाची उभारणी तसेच जिल्ह्यातील राज्य परिवहन मंडळाच्या सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील असे श्री. संखे पुढे म्हणाले.

सर्वांनी जनतेपर्यंत पोहोचण्यास काही हरकत नाही

जनता दरबारच्या आयोजनादरम्यान ना. गणेश नाईक यांनी लोक दरबाराच्या आयोजना विषयी नाव न घेता टिप्पणी केली होती. याप्रसंगी त्यांनी कुठल्याही मंत्र्यांनी कुठेही दरबार घ्यावे व जनतेच्या दारात जाऊन त्यांना भेडसावत असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे नमूद केले होते. तर लोकदरबाराचे आयोजन होत असताना त्यावर टिप्पणी करताना स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांनी आपण पुन्हा पुन्हा जनतेच्या दरवाजात जाऊन प्रश्न सोडवू व लोकदरबाराचे आयोजन करत राहू असे सांगून जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमधील चढाओढ अधोरेखित केली.

इतर पक्षाला बॅनरवर स्थान नाही

शिवसेनेचा लोकदरबार च्या आयोजनाबाबत झळकलेल्या बॅनर मध्ये सार्वजनिक समाज उपयोगी, प्रशासकीय तसेच आपल्या परिसरातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लोक दरबारात उपस्थित राहण्याचे बॅनर मध्ये फक्त शिवसेनेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची छायाचित्र लावण्यात आली आहेत. यात लोकदरबाराला पक्षीय स्वरूप असल्याने मित्र पक्षांच्या नेत्यांची छायाचित्र बॅनरवर नाहीत. भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध विक्रमगड म्हणून निवडणूक लढवणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांना पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या वेळी व्यासपीठावर बसवले होते, मात्र त्यांना लोकदरबार च्या बॅनर मध्ये स्थान मिळालेले नाही.