मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर देखभाल दुरुस्ती योग्य पद्धतीने न करणाऱ्या ठेकेदार कंपनीविरुद्ध तलासरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे झाले आहे. त्या अनुषंगाने देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांमार्फत तलासरी व अपघातप्रवण क्षेत्रातील खड्डे बुजवण्यास आरंभ झाला असला तरी रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली थातूरमातूर मलमपट्टी करण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.तलासरी तालुक्यातील आमगावजवळ सलग दोन दिवशी झालेल्या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी देखभाल दुरुस्ती करणारी आर.के. जैन कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणानंतर महामार्गावर खड्डे बुजवण्याच्या कामाला आरंभ झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डय़ांचे प्रमाण वाढले आहे. पाऊस सुरू असताना पाणी साचलेल्या खड्डय़ातच खडी-मुरूम-भुकटी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असल्याने बुजवलेले खड्डे काही तासांतच उघडे पडत आहेत. ही डागडुजी दिखाव्यासाठी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.पावसाळय़ात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडणारे जीवघेणे खड्डे हे नित्याचेच झाले आहे. मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी लागणारी साधनसामुग्री पावसाळय़ापूर्वी गोळा करण्यास संबंधित ठेकेदार कंपनी अपयशी ठरली आहे. मुरूम माती व खडीने खड्डे बनण्याऐवजी कोल्ड मिक्सद्वारे खड्डे भरणे अभिप्रेत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

लाखोंची टोलवसुली, मात्र रस्ता दुर्लक्षित
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताला आमंत्रण देणारे हे खड्डे आहेत. एकीकडे दररोज लाखो रुपये टोलवसुली करणाऱ्या कंपनीने पावसाळय़ात खड्डे बुजविण्यासाठी व्यवस्था का केली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. खड्डय़ांमुळे मोठा अपघात घडून जीव गेल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून महामार्गावर पडलेले खड्डे हे सध्या तात्पुरत्या स्वरूपात बुजवले जात आहेत, असे वाहनचालक, प्रवाशांकडून म्हटले जात आहे.

गुन्ह्याबाबत जाबजबाब
तलासरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या महामार्ग देखभाल दुरुस्ती ठेकेदाराविरुद्ध गुन्ह्यामध्ये व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांकडून जाबजबाब पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर झालेल्या करारनाम्याची प्रत मागविण्यात आली असून त्याचा अभ्यास करून आवश्यकता भासल्यास इतर संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Story img Loader