वाडय़ात चौरंगी लढती
रमेश पाटील
वाडा : सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीय आरक्षण रद्द केल्याने पालघर जिल्ह्यात रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १५ व पंचायत समितीच्या १४ जागांसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकाहोत आहेत. या पोटनिवडणुकीत वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गारगांव, मोज, मांडा, पालसई, अबिटघर या पाच जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर पंचायत समितीच्या सापणे बुद्रुक या एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप हे प्रमुख पक्ष या निवडणुकीत स्वबळावर उतरले आहेत. यामुळे तालुक्यात चौरंगी लढती रंगणार आहेत.
दीड वर्षांपूर्वी (जानेवारी २०२०) झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत वाडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा जिंकून मोठे यश मिळविले होते, तर शिवसेनेला एका अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसह दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष म्हणून ख्याती मिरविणाऱ्या काँग्रेस व भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांना भोपळाही फोडता आलेला नव्हता.
आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या गारगांव गटात गतनिवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी शेलार यावेळी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांची लढत शिवसेनेच्या नीलम पाटील, भाजपच्या करुणा वेखंडे व काँग्रेसच्या सुवर्णा बातरा यांच्या बरोबर होत आहे. या गटात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या योगिता कडू यासुद्धा निवडणूक रिंगणात आहेत.
मोज गटातून शिवसेनेचे अरुण ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद देशमुख, भाजपचे अतिष पाटील व काँग्रेसचे लोकेश पाटील या चार उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. रुपेश देशमुख या अपक्ष उमेदवाराचा फारसा प्रभाव पडणार नाही.
मांडा गटातून गत निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अक्षता चौधरी यावेळी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सुवर्णा पाटील, भाजपचे राजेंद्र पाटील, बहुजन विकास आघाडीचे संतोष बुकले, काँग्रेसच्या शुभांगी पाटील हे प्रमुख उमेदवार उभे आहेत.
पालसई गटातून भाजपच्या धनश्री चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुगंधा पाटील, शिवसेनेच्या मिताली बागुल, काँग्रेसच्या कृपाली सावंत या उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अबिटघर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भक्ती वलटे, शिवसेनेच्या दिव्या म्हसकर, भाजपच्या मेघना पाटील काँग्रेसच्या तनुजा वेखंडे व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अंजली बाबर या पाच उमेदवारांमध्ये लढत होत आहे.
वाडा तालुक्यात पंचायत समितीच्या सापणे बुद्रुक या एकमेव गणामध्ये पोटनिवडणूक होत आहे. या गणात गतवर्षी विजयी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्तिका ठाकरे या पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. या गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरी पाटील, शिवसेनेच्या द्रिष्टी मोकाशी व काँग्रेसच्या लीना पाटील या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. भाजपने या गणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
वाडा तालुका जिल्हा परिषद गट
’ गारगांव – ५ उमेदवार
’ मोज – ५ उमेदवार
’ मांडा – ६ उमेदवार
’ पालसई – ६ उमेदवार
’ अबिटघर – ५ उमेदवार