पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी पालघर दौऱ्यात वाढवणची ठरलेली भेट न घेतल्याने वाढवणवासीय नाराज आहेत.
पक्ष पुनर्बाधणी करण्यासाठी तसेच स्थानिक समस्या समजून घेण्यासाठी अमित ठाकरे मंगळवार व बुधवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला होता. यामध्ये पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड व वाडा अशा तालुक्यांमध्ये भेट देऊन, तेथील स्थानिकांच्या समस्या समजून घेण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. यादरम्यान बोईसर येथून डहाणूकडे जात असताना अमित ठाकरे वाढवण येथे जाऊन संघर्ष समितीला भेट देणार होते तसेच वाढवणवासीयांच्या समस्या जाणून घेणार होते. मात्र वाढवणला न येता ते थेट डहाणूला निघून गेले. त्यामुळे समाजमाध्यमांसह वाढवण व परिसरातील गावांमध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधात नाराजी पसरू लागली.
अमित ठाकरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते वाढवण येथे येऊ शकले नाहीत, असा संदेश डहाणूतील मनसेच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने वाढवण संघर्ष समितीच्या एका पदाधिकाऱ्याला दिला. मात्र त्यानंतर अमित हे डहाणूतील एका गावातील घराच्या अंगणात फुटबॉल खेळताना दिसले. त्यामुळे प्रकृतीचे कारण न पटल्याचे सांगत ही ध्वनीचित्रफीत टाकून वाढवणवासीयांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र वाढवणला भेट न देण्यामागे प्रकृतीचे कारण नसून वेळेचे बंधन आणि नियोजन महत्त्वाचे असल्याने अमित ठाकरे यांनी थेट डहाणू गाठले, असे स्पष्टीकरण मनसेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. वाढवण येथील नागरिकांना व समितीला डहाणू येथे भेट घेण्यासाठी बोलावले होते. मात्र त्यांनी येण्यास नकार दिला, असेही या पदाधिकाऱ्यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी बंदराला विरोध केला होता, तसेच वाढवण बंदर विरोधी संघर्षांमध्ये ते येथील नागरिकांसोबत असल्याचा शब्दही दिला होता. आजोबांप्रमाणेच अमित ठाकरे हेदेखील वाढवण येथे येऊन वाढवणवासीयांना ठाम शब्द देतील अशी अपेक्षा वाढवणच्या रहिवाशांना होती. मात्र ते न आल्यामुळे वाढवणसह इतर गावांमध्ये नाराजी पसरली आहे.
राजकारणातील उदयोन्मुख नेतृत्त्व म्हणून अमित ठाकरे यांनी वाढवण येथे येणे अपेक्षित होते. समस्या जाणून घ्याव्यात हीच वाढवणवासीयांची अपेक्षा होती. मात्र ते न झाल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. – वैभव वझे, सहसचिव, वाढवण बंदर विरोधी संघर्ष कृती समिती
वाढवणला जाणे हे आमच्या वेळापत्रकामध्ये नव्हते. वाढवण संघर्ष समितीचे शिष्टमंडळ बैठकीच्या ठिकाणी येऊन निवेदन देतील, असे होते. त्याप्रमाणे ते निवेदन देवून गेले आहेत. – अमित ठाकरे