डहाणू: तलासरी तालुक्यातील उधवा आंतरराज्यीय सीमेवर बुधवार ३० ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास तलासरी पोलिसांनी वाहनामध्ये मोठी रक्कम घेऊन जाणारे एक वाहन जप्त केले आहे. वाहनामध्ये ४ कोटी ३३ लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे.

तलासरी पोलीस ठाणे हद्दीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपासणी करत असताना दादरा नगर हवेली येथून उधवा बाजूला येणाऱ्या एका वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे आढळून आले आहेत. सध्या वाहनासह वाहनातील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी दिलेल्या माहिती नुसार एका नामांकित बँकेच्या एटीएम मध्ये पैसे टाकण्यासाठी पैसे नेले जात असल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे.

हेही वाचा >>>ठाणे पालिकेकडून आशा सेविकांना सहा हजार रुपयांची दिवाळी भेट; सानुग्रह अनुदानसह ऑक्टोबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांचे बॅंक खात्यात जमा

जप्त केलेल्या वाहनातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तपास सुरू असून रोकड तपासणी सुरू आहे. याविषयी निवडणूक आयोगाच्या यंत्रणेला माहिती देण्यात आली असून चौकशी नंतर योग्य ती माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.