बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामामुळे घराना भेगा पडल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामस्थांनी प्रकल्पाचे काम बंद पाडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. ठेकेदार कंपनीने मात्र खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट केल्याचा इन्कार केला.
डहाणू तालुक्यातील गोवणे गावाजवळ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी खोदकाम करताना जमिनीला हादरे बसून राहत्या घरांना भेगा पडल्याची तक्रार गोवणे येथील दहा ते बारा कुटुंबीयांनी केली असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर बुलेट ट्रेन आणि ठेकेदार कंपनीच्या अभियंत्यानी नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. मात्र नुकसान भरपाई देण्याबाबत कोणतेही आश्वासन न मिळाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली गोवणे येथे सुरू असलेले बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम बंद पाडले. यावेळी प्रकल्पासाठी मातीची वाहतूक करणारी वाहने देखील ग्रामस्थांनी रोखून धरत जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू न देण्याचा इशारा दिला.
भुसुरुंग स्फोटामुळे घरांना भेगा पडल्याचा ग्रामस्थांचा आरोप
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या उन्नत मार्गाचे काम पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. बुलेट ट्रेन मार्गाचे खांब उभारण्यासाठी यंत्राच्या सहाय्याने जमिनीमध्ये ३० ते ४० फूट खोल खड्डे खोदण्यात येत असून खोदकामादरम्यान लागणारे दगड फोडण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येतो.
मात्र गोवणे येथील बुलेट ट्रेन मार्गातील खांबांच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील दगड फोडण्यासाठी रात्रीच्या सुमारास गुपचूपपणे भुसुरुंग स्फोट करण्यात आल्यामुळे घरांना भेगा पडल्याचा आरोप नुकसानग्रस्त कुटुंबीयांनी केला आहे. रात याबाबत बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठेकेदार कंपनीकडे तक्रार दिल्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्प आणि ठेकेदार कंपनीच्या अभियंत्यांकडून भेगा गेलेल्या घरांची संयुक्तपणे पाहणी केली. मात्र नुकसान भरपाई बाबत कोणतेही आश्वासन न दिल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या नेतृत्वाखाली बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम बंद पाडले.
यावेळी झालेल्या चर्चेत ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट केल्याचा इन्कार केला. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाणगाव पोलिसांपर्यंत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गोवणे गावातील घरांना भेगा पडून झालेल्या नुकसानीबाबत तज्ञ अभियंता यांच्याकडून पुन्हा तपासणी करण्यात येईल. नेमक्या कोणत्या कारणांमुळे घरांना भेगा पडल्या याचा अहवाल आल्यानंतर नुकसान भरपाईचा निर्णय घेण्यात येईल.- विजय मारुती, विभाग प्रमुख २, ठेकेदार कंपनी