नीरज राऊत
चाचणीचे अहवाल जलदगतीने येत असल्याने रुग्णांवर उपचार करणे शक्य; करोना संसर्ग रोखण्यात यश
पालघर: जिल्ह्यच्या करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहण्यासाठी जिल्ह्यतील प्रतिजन चाचणी निर्णायक ठरल्याचे दिसून येत आहे. रटीपीसीआरपेक्षा अँटीजन चाचणीचे अहवाल जलद येत असल्याने रुग्णांवर उपचार करणे शक्य होत आहे. त्यामुळे प्रभावित क्षेत्रातील करोनाचा संसर्ग नियंत्रणात येण्याला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे.
एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यत आढळलेल्या २८ हजार २२६ करोना रुग्णांपैकी तब्बल पंधरा हजार नागरिकांना करोना झाल्याचे हे प्रतिजन चाचणीतून आढळून आले आहे. या कालावधीत जिल्ह्यत झालेल्या ४४ हजार ४३६ आरटीपीसीआर तपासणीच्या अडीच पटीने प्रतिजन चाचणी झाल्याने रुग्ण शोध घेण्यास ही पद्धत लाभदायक ठरली आहे. २९ मार्च ते ३० मेदरम्यान जिल्ह्यतील एक लाख ५४ हजार ८३५ नागरिकांची अँटीजन आणि आरटीपीसीआर नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी २८ हजार २२६ नागरिकांना करोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. यामध्ये एक लाख दहा हजार ३९९ नागरिकांची प्रतिजन चाचणी करण्यात आली होती. यात सरासरी साडेतेरा टक्के नागरिकांना करोना संसर्ग झाल्याचे आढळून आले.
जिल्ह्यत फक्त १०० आरटीपीसीआर नमुन्यांची तपासणी क्षमता आहे. त्याहून जास्त असलेले नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. अशा तपासणीचा अहवाल येण्यासाठी चार ते पाच दिवसांचा अवधी लागत असतो. यादरम्यान रुग्ण अनेकदा गंभीर झाल्यास त्याला प्राणवायू व रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे लागते. यामध्ये प्रशासकीय यंत्रणेची धावपळ होते. त्यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने लक्षणे दिसणाऱ्या तसेच संशयित रुग्णांची प्रतिजन नमुने तपासणी मोहीम सुरू केली. एप्रिल महिन्याच्या मध्यापासून दर आठवडय़ाला सरासरी १७ हजार प्रतिजन तपासणी केल्याचे दिसून आले आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात देखील २४ हजारपेक्षा अधिक प्रतिजन चाचणी केल्या गेल्या आहेत. जिल्ह्यमध्ये पुरेशा प्रमाणात प्रतिजन चाचणी संच उपलब्ध करण्याच्या दृष्टीने अडचणीच्या प्रसंगी वसई— विरार महानगरपालिकेकडून संच घेण्यात आले होते. सद्यस्थितीत जिल्ह्यने पन्नास हजार प्रतिजन चाचणी संचाची खरेदी प्रक्रिया राबवली आहे.
बाधितांचे प्रमाण सव्वासहा टक्क्यांवर
२९ मे रोजी संपलेल्या आठवडय़ात पालघर जिल्ह्यतील बाधितांचे प्रमाण ६.२६ इतके नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्यत २९ मार्चपासून व्यापक प्रमाणात सुरू केलेल्या प्रतिजन चाचणीअंतर्गत सरासरी बाधितांचे प्रमाण १३.६ इतके असले तरी १२ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान हे प्रमाण सर्वाधिक ६१ टक्के इतके असल्याचे दिसून आले होते. त्याचप्रमाणे मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात प्रतिजन चाचणीअंतर्गत बाधितांचे प्रमाण सव्वातीन टक्कय़ांपर्यंत खाली आल्याचे दिसून आले आहे.