नीरज राऊत, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार आणि डहाणू या आदिवासीबहुल तालुक्यांत १८ वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, कुपोषण उन्मुलन, जलसंधारण, शेती सुधारणा तसेच समाज सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या ‘आरोहन’ संस्थेचा ‘आदिवासी विकास संसाधन केंद्र’ उभारण्याचा मानस आहे. दुर्गम भागातील शाश्वत विकासासाठी हे बहुउद्देशीय केंद्र महत्त्वाचे ठरणार असल्याने समाजातील दानशूरांनी अर्थसाह्य करावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.   

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : आदिवासी उत्थानाचे ‘आरोहन’

आरोहन संस्थेचे काम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५० हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचले आहे. आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्याच्या उद्देशाने मुंबईतील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयाचा एक प्रकल्प म्हणून ‘आरोहन’चे काम सुरू झाले. कुपोषणाची समस्या सोडवायची तर स्थलांतराला आळा घालणे आवश्यक आहे आणि स्थलांतराला आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर उपजीविकेच्या पर्यायी साधनांची निर्मिती करणे गरजेचे आहे, हे संस्थेच्या लक्षात आले. मोखाडय़ासारख्या अतिदुर्गम भागातील भूरचना लक्षात घेऊन संस्थेने जलसंधारणाची कामे हाती घेतली. वाहून जाणारे पाणी अडवून जलसाठे निर्माण केले. आदिवासींना पाणी उपलब्ध करून दिले. संस्थेने आजवर २२० जलसंधारण प्रकल्प राबवले आहेत. त्यांचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी आणि संरक्षक सिंचनासाठी होत आहे.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : ‘नकोशीं’ना नवजीवन

आदिवासींमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करताना संस्था माता आणि बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहे. पोषण आहारासंदर्भात जनजागृती करीत कुपोषण कमी करण्याचे संस्थेचे प्रयत्न आहेत. करोना साथीच्या काळात संस्थेने ७० गावपाडय़ांवर ‘मजेशीर शाळा’ हा उपक्रम राबवून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचे कार्य केले आहे.  आदिवासी पाडे, गावे स्वयंपूर्ण व्हावीत, उपजीविकेसाठी स्थलांतर करण्याची वेळ आदिवासी कुटुंबांवर येऊ नये, त्यांचा शाश्वत विकास व्हावा याकरिता संस्था ‘आदिवासी विकास संसाधन केंद्र’ उभारणार आहे. आदिवासींमध्ये कौशल्य विकास, क्षमतानिर्मिती, विकासासाठी विविध प्रयोगांचा अवलंब, तांत्रिक प्रशिक्षण, कृषी सुधारणा आणि आदिवासींना तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळण्यासाठी ‘आदिवासी विकास संसाधन केंद्र’ उभारणे आवश्यक आहे, असे संस्थेला वाटते. स्थानिक विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळनिर्मिती हेही संस्थेचे एक उद्दिष्ट आहे. या संसाधन केंद्राच्या उभारणीसाठी नागरिकांकडून भरीव योगदानाची अपेक्षा आहे. 

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arohan ngo in palghar empowering tribal communities zws