डहाणू : अदानी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून राख वाहून नेणाऱ्या ट्रकमधून राख पडून डहाणू-झाई राज्यमार्ग धोकादायक बनला आहे. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा राख भरली जाते शिवाय फेऱ्या वाढवण्यासाठी ट्रकचालक भरधाव वाहने हाकतात. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
डहाणू आसनगावच्या हद्दीमधील अदानी औष्णिक ऊर्जा प्रकल्पामधून निघणाऱ्या कोळशाच्या राखेची वाहतूक करण्यासाठी वाणगाव ते चारोटीहून राज्यमार्गावर आणि डहाणू खाडीहून बोर्डी मार्गाने अरुंद मुख्य रस्त्यावरून दररोज ७० ते ८० ट्रक वाहतूक करत आहेत. या कोळशाच्या राखेपासून वीट, सिमेंटचे पत्रे बनवले जातात. महाराष्ट्र तसेच गुजरातमध्ये ही वाहतूक केली जाते. अदानी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारी राख अल्प दरात दिली जाते. जेवढय़ा राखेच्या वाहनांच्या फेऱ्या अधिक तेवढा मोबदला अधिक मिळतो. त्यामुळे मग जास्तीतजास्त राख आणि जास्तीतजास्त फेऱ्या पूर्ण करण्याकरता वाहनचालक वाहनात क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त राख भरतात. शिवाय फेऱ्या वाढवण्यासाठी वाहने सुसाट हाकली जातात. परिणामी वाहतुकीदरम्यान ही राख रस्त्यावर सांडते. राखेवरून दुचाकी सरकतात, घसरून अपघात होतात. तसेच प्रचंड माल घेऊन वेगात धावणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांची अवस्थाही वाईट झाली आहे. डहाणू तालुक्यामधील बंदरपट्टीतील वाणगाव, आसनगाव, धाकटी डहाणूच्या मार्गावर अवजड वाहनांमुळे अपघाताचे प्रमाणे वाढले आहे.
त्याचप्रमाणे ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक वजनाची राख भरली जाते. त्यामुळे काही वेळा या ओझ्याने ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडतात आणि अपघात होतात. मुख्य रस्त्यावरून आसपासच्या पंधरा ते वीस गावांतील नागरिक, शाळकरी मुले, नोकरदार ये-जा करत असतात. त्या सर्वासाठीच हे फार धोकादायक आहे.
वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी
याबाबत अदानी प्रकल्पाच्या प्रवक्त्यांशी बोलले असता ते म्हणाले की, अदानी प्रकल्पाने राख वाहून नेण्यासाठी कडक नियम आखून दिले आहेत. मात्र ही वाहने जर वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसतील अशा बेशिस्त वाहनचालकांवर पोलीस खात्याने निर्बंध लादणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा