पालघर : प्लास्टिक मुक्तीच्या अनुषंगाने पहिले पाऊल म्हणून पालघर जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारी असणाऱ्या दुकानदारांकडून प्लास्टिक पाकिटामध्ये मिळणारा खाऊ पूर्णपणे बंद करण्यात यावा व शक्य झाल्यास कागदी पिशव्यांमध्ये देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी प्रशासकीय अधिकारी व समुद्रकिनारी विक्री करणाऱ्या दुकानदारांना दिल्या.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मंगळवारी शिरगाव समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन व जनजागृती करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रूपाली सातपुते, इतर प्रशासकीय अधिकारी, शिरगाव ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्वच्छता यंत्राचा वापर करून समुद्रकिनाऱ्याची साफसफाई करण्यात आली. यानंतर उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः प्लास्टिक व कचऱ्याचे संकलन करत श्रमदान केले. जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी शिरगाव येथील स्थानिक दुकानदारांशी संवाद साधून समुद्रकिनारी प्लास्टिकमधील वस्तू विक्री न करण्याचे आवाहन केले. तसेच पर्यटकांनी प्लास्टिक कचरा समुद्रकिनारी न आणावा यासाठी सतत जनजागृती आणि कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले. संपूर्ण जिल्ह्यात प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत संकलित प्लास्टिक कचरा स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत उभारण्यात आलेल्या तालुका स्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पात पाठवावा. ज्या तालुक्यांमध्ये हे प्रकल्प नाहीत, त्यांनी स्थानिक प्लास्टिक पुनर्विक्रेत्यांकडे कचरा वर्ग करावा. असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिले.