बागायतदारांचा मोबदला देण्यास व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ

नीरज राऊत
पालघर:  व्यापाऱ्यांनी कोटय़वधींची थकबाकी थकविल्यामुळे पालघर जिल्ह्यतील बागायतदारांनी चिंता व्यक्त केली आहे. वेगवेगळी कारणे देऊन मोबदला देण्यास व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार बागायतदारांकडून करण्यात येत आहे. थकबाकीची रक्कम वसुली करणे प्रलंबित असल्यामुळे भाजीपाला हंगामाला नव्याने सुरू करताना आर्थिक समस्या उभी राहिल्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू तालुक्यात सुमारे १५०० एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीची व तितक्याच प्रमाणात तिखट मिरचीची लागवड केली जाते. त्याशिवाय बागायतदारांकडून किरकोळ प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला लागवड करण्यात येते. भाजीपाल्यासाठी मुख्य बाजारपेठ मुंबई येथे असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून येथील भाजीपाला पाठवण्याऐवजी व्यापाऱ्यामार्फत भाजीपाला मुंबईसह देशातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये पाठवण्यात येतो.

गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी येथील भाजीपाला खरेदी करून वर्षांला दोन ते तीन वेळा या खरेदी केलेल्या भाजीपाल्याचा मोबदला देत असतात. गेल्या काही वर्षांपासून मंदीचे कारण सांगून व गेल्या वर्षभरापासून करोनामुळे व्यवसायामधील उधारी शिल्लक असल्याचे कारण सांगत व्यापाऱ्यांनी बागायतदारांना शेतमालाचा मोबदला देण्याचे टाळले आहे. अशा प्रकारे डहाणू तालुक्यातील बागायतदारांची चार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम येणे शिल्लक असल्याचे शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समजले. अनेक व्यापारी आपल्या परराज्यातील मूळ गावी निवास करत असल्याने त्यांच्याशी संपर्क करणे कठीण होत आहे.

पुढील हंगामासाठी मिरची रोप लागवडीचे काम सुरू झाले आहे. रोपे तयार करण्याच्या प्रक्रियेत बियाणे टाकण्याची कामे हाती घेण्यात आले आहे. गणेशोत्सवानंतर शेडनेट उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. बागायतदारांना त्या वेळी मजुरीसाठी पैशाची गरज भासणार आहे. व्यापाऱ्यांकडून उधारीप्रकरणी काही बागायतदारांनी पोलिसांकडे आपले निवेदन दिल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी थकीत रक्कम काही प्रमाणात दिली आहे. तर उर्वरित रक्कम सप्टेंबर महिन्यात देण्याची आश्वासन काही व्यापारी मंडळींने दिल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात अनेक लहान व मध्यम बागायतदारांच्या थकीत रक्कमेची माहिती पुढे आलेली नाही. शेतकरी बागायतदार पुढील हंगामासाठी खेळते भांडवल कुठून आणायचे या चिंतेत आहेत.

२०१३ साली स्थापन झालेल्या माहीम विविध सहकारी संस्थेत साडेसहाशेपेक्षा अधिक सभासदांचे नारळ खाते होते. सध्या ही संख्या अडीचशेच्या आसपास आली असून उर्वरित बागायतदार खासगी व्यापाऱ्यांना शाळांचा पाडा देत आहेत. हे व्यापारी नारळाला थोडाफार अधिक दर देत असले तरी एकंदर थकबाकीचा विचार केला तर सहकारी संस्थेतील लाभ सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांना मिळत आहे तर खासगी व्यापारी विविध प्रकारे बागायतदारांची फसवणूक करताना दिसून येतात.

– मिलिंद म्हात्रे, संचालक माहीम विविध सहकारी संस्था नारळ, पानवेल बागायतदारदेखील उधारीच्या संकटात

पालघर तालुक्यात भाजीपाल्यासह जिल्ह्यतील नारळ व पानवेल बागायतदारदेखील उधारीच्या संकटात सापडले आहेत. केळवे-माहीम परिसरात पान खरेदी-विक्रीमध्ये व्यवसायात असलेल्या खासगी व्यापारी व सहकारी संस्थची दोन ते अडीच कोटी रुपयांच्या जावळपास थकबाकी आहे. येथील पान उत्तरेच्या राज्यामध्ये विक्री करीत जात असून तेथील व्यापाऱ्यांनी प्रत्यक्षात वसुली केली असली तरी स्थनिक व्यापाऱ्यांना शेतमालाचा पुरेशा प्रमाणात मोबदला देत नसल्याचे सांगण्यात आले. याच भागातील खासगी व्यापाऱ्यांना विक्री करणाऱ्या नारळ उत्पादकांचीदेखील दोन कोटी रुपयांची उधारी असल्याची माहिती पुढे आली आहे.

व्यापाऱ्यांचा तोटा?

करोना परिस्थितीत व्यापाऱ्याने तोटा झाल्याचे तसेच किरकोळ विक्री केलेल्या ठिकाणांहून विक्रेत्यांनी पैसे न दिल्याचे कारण सांगून व्यापाऱ्यांनी थकबाकी ठेवल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक व्यापाऱ्यांनी उपलब्ध झालेला पैसा इतर व्यवसायामध्ये गुंतविल्याचे तर काही व्यापाऱ्यांनी आपल्या मूळगावी अलिशान बंगले बांधल्याची माहिती आहे. नगदीवर विकण्यात येणाऱ्या भाजीपाल्यात व्यापाऱ्यांचा इतक्या मोठय़ा प्रमाणात तोटा होऊ शकतो यावर बागायतदार विश्वास ठेवायला तयार नाहीत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid traders from paying gardeners ssh
Show comments