पालघर: वन्य प्राण्यांना व विशेषता शाकाहारी असणाऱ्या लहान प्राण्यांना जंगलामध्ये खाद्य मिळावा या उद्देशाने भौगोलिक मानांकन प्राप्त झालेल्या बहाडोली (पालघर) येथील जांभूळ झाडांची लागवड विदर्भ, मराठवाडा सह राज्यभरात केली जाणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. जिल्ह्यातील विविध रोपवाटिके उपलब्ध असणारी सर्व जांभळाची रोप वन विभागाने खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.राज्याने जंगली हिंसक प्राण्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने उपाययोजना राबविल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत मर्यादित जागेत वास्तव्य करताना या हिंसक जंगली प्राण्यांचा मानवी भागात शिरकाव करून संघर्ष होण्याचे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी खेळताना दिसत आहेत. अनेक भागांमध्ये कुत्रे तसेच शेळी- मेंढ्या सारखे पाळीव प्राणी नाहीसे झाल्याचे दिसून येत असून जंगली प्राण्यांची अन्नसाखळी कायम राहण्याच्या दृष्टीने वन विभागाने उपाय योजना आखात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामध्ये बहाडोलीच्या जांभूळ झाडांची लागवड राज्यभरात करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
जंगलात असणाऱ्या शाकाहारी प्राण्यांना वेगवेगळी खाद्य म्हणून आवडत असतात. त्या अंतर्गत विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सह राज्यातील विविध जंगलांमध्ये जांभूळ लागवडीची योजना आखण्यात आली आहे. सध्या पालघर जिल्ह्यात शासकीय रोपवाटिका (नर्सरी) मध्ये असणाऱ्या १७.५० हजार जांभूळ रोपांसह सुमारे २० हजार रोपे वन विभागाने विकत घेऊन त्याचे पावसाळ्यापूर्वी राज्यभरात वितरण करण्याच्या सूचना पालघरचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी कृषी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आगामी काही वर्षांसाठी ही योजना सुरू ठेवण्यात येणार असून त्या दृष्टीने जांभूळ कलमांचे उत्पादन याच प्रमाणात करण्यासंबंधी आखणी करण्याचे त्यांनी सुचित केले.
राज्यातील विविध वनक्षेत्रांमध्ये जांभूळ लागवड केल्यानंतर सौर ऊर्जा प्रणालीच्या माध्यमातून या झाडांची जोपासना करण्याची योजना आखण्यात येणार असून यामुळे वानर, ससे व इतर लहान प्राण्यांना सहजगत खाद्य उपलब्ध होईल याकडे लक्ष वेधले.
पालघर मध्ये सुरंगी ची लागवड
वेंगुर्ला भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सुरंगी या झाडाची लागवड पालघर जिल्ह्यात किमान १०० एकर क्षेत्रफळावर व्हावी या दृष्टीने वनविभागाने नियोजन केले असून या प्रकल्पांतर्गत वेंगुर्ले इथून पाच हजार सुरंगी रोप पालघर मध्ये लागवडीसाठी आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सुगंधी झाडामुळे मध उत्पादनाचा फुलांच्या परागण करिता उपयुक्त या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत असल्याची माहिती गणेश नाईक यांनी दिली.
जुनी वाहने निर्लेखित करा
ज्या वाहनांचे आयुर्मान तसेच वाहन फिरण्याचे अंतर शासकीय नियमात उल्लेखित मर्यादेपेक्षा अधिक झाले असेल अशा वाहनांना आवश्यक प्रक्रिया राबवून निर्लेखन करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या. नवीन वाहनांची खरेदी करताना विद्युत प्रणाली वर आधारित (इलेक्ट्रिक) वाहने खरेदीसाठी आवश्यक इ- पर्याय उपलब्ध करण्यासाठी परिवहन विभागाशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.
जांभूळ झाडाचे कलम तयार होण्यास लागणारा अवधी
बहाडोली येथील जांभळ्याच्या झाडापासून कलम बांधण्याची प्रक्रिया जुलै, ऑगस्ट महिन्यात सुरू होते. मात्र या कलमाचे मजबुतीकरण होण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी पर्यंतचा कालावधी लागत असून पुढील वर्षी वनविभागाला लागणाऱ्या जांभूळ कलमाची तयारी यंदा च्या पावसाळ्यापासून हाती घ्यावी लागणार असल्याचे पालघरच्या कृषी विभागाकडून सांगण्यात आले.