आदिवासी पाणी, रस्ता, आरोग्य सुविधांच्या प्रतीक्षेत
रमेश पाटील
वाडा: पालघर जिल्ह्य़ाच्या दुर्गम भाग गेल्या ७० ते ७५ वर्षांपासून सुविधांपासून वंचित आहे. मोखाडा, वाडा, विक्रमगड, जव्हार या तालुक्यांतील अनेक पाडय़ांचा त्यात समावेश असून सुविधा नसल्याने आदिवासी ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून दैनंदिन जीवन जगणे ही त्यांच्यासाठी तारेवरची कसरत झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड या तालुक्यांतील अतिदुर्गम भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. प्रत्येक पाडय़ात २०० ते ३०० जणांची लोकवस्ती आहे. असे सुमारे १२ ते १५ पाडे असून येथील आदिवासी कुटुंबे आजही सुविधांसाठी संघर्ष करीत आहेत. मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणारा दिवलपाडा, जव्हार तालुक्यातील देहेरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नवापाडा, विक्रमगड तालुक्यातील मलवाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील म्हसेपाडा, वाडा तालुक्यातील आखाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील भगतपाडा, ओगदा ग्रामपंचायतीमधील टोकरे पाडा, जांभूळ पाडा अशा अनेक पाडय़ांमध्ये ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यातील चार महिने या गाव, पाडय़ांचा अन्य गावांशी सपर्क तुटत असतो. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडे ठेवून महिलांना पाणी आणावे लागत आहे.
वाडा तालुक्यातील आखाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील भगतपाडा या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांचे पावसाळ्यातील चार महिने अत्यंत जिकिरीचे जातात. येथील दोनशेहून अधिक ग्रामस्थांचा पावसाळ्यात अन्य गावांशी संपर्क तुटतो. हा पाडा पिंजाळी नदीपलीकडे असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने जिवावर उदार होऊन नदी पार करावी लागते.
विक्रमगड तालुक्यातील मलवाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील म्हसेपाडा व तोरणे पाडा या दोन्ही पाडय़ांना पावसाळ्यात पिंजाळी व गारगाई नदीचा वेढा बसतो. तर दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल अशा परिस्थितीत हे दोन्ही पाडे पावसाळ्यातील चार महिने अन्य गावांशी संपर्कहीन राहतात. येथे जाण्यासाठी आजही रस्ता नाही.
पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या चार तालुक्यांतील दुर्गम भागातील अनेक गाव-पाडय़ापर्यंत रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, वाहतूक सेवा नाही. आरोग्याच्या सुविधा जवळपास नसल्याने व रस्त्याअभावी वाहन गावात येत नसल्याने रुग्णांना डोली करून दवाखान्यात न्यावे लागते. अनेक पाडे अन्न, वस्त्र, निवारासाठी धडपडत आहेत.
रोजगार नसल्यामुळे स्थलांतर
आदिवासी, दुर्गम भागात रोजगार नसल्याने या चारही तालुक्यांतील हजारो कुटुंबे वर्षांतील आठ महिने रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतर होत असतात. आजही अनेक पाडे ओस पडलेले दिसून येत आहेत, गावात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे येथील आदिवासी बांधव वीटभट्टीच्या कामासाठी वसई, भिवंडी, कल्याण या तालुक्यांत स्थलांतरित झाले आहेत.
वन कायद्यांमुळे रस्ते अडले
दुर्गम भागातील आदिवासी, गोरगरीब जनतेची गाऱ्हाणी नेहमीच शासनदरबारी मांडत असतो, गेला आठवडाभर मी स्वत: दुर्गम भागातील पाडय़ांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेत आहे. जंगल भागातील बहुतांशी पाडय़ांमध्ये जाण्यासाठी वन कायद्यांमुळे रस्त्यांची कामे अडून राहिली आहेत, असे विक्रमगड तालुक्यातील उटावली गटाचे जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे यांनी सांगितले. रोजगार हमीच्या माध्यमातून येथील आदिवासी मजुरांना नियमित काम उपलब्ध करून दिले तर येथील स्थलांतर थांबेल.
–रोहिणी शेलार, जिल्हा परिषद सदस्या, गारगांव गट, ता. वाडा.
१५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध होणाऱ्या निधीचा जास्तीत जास्त उपयोग पिण्याच्या पाण्याच्या सुविधांसाठी खर्च करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
-रघुनाथ माळी, सभापती, पंचायत समिती, वाडा.