तालुक्यातील जि. प. गटात चार पक्ष आमने-सामने

निखिल मेस्त्री

पालघर : जिल्ह्यातील २९ जागांपैकी पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीचे नऊ अशा ११ जागांवर निवडणूक होणार आहे. या जागांवर बहुरंगी लढती होणार असल्याचे दिसून येत आहे. पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सावरे एम्बुर या गटामध्ये पाच, तर नंडोरे देवखोप या गटामध्ये सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर तालुक्यातील नऊ पंचायत समिती गणासाठी ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार एकमेकांना आव्हान देणार असल्याने ही निवडणूक तालुक्यात चुरशीची होईल असे दिसते.

जिल्हा परिषदेच्या सावरे एम्बुर गटांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत. या गटामध्ये याआधी सदस्यपद रद्द झालेल्या शिवसेनेच्या महिला उमेदवारासमोर भाजप व बहुजन विकास आघाडीचे आव्हान असेल.

नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गट पोटनिवडणुकीसाठी  शिवसेना-भाजप अशी दुरंगी लढत प्रत्यक्षात असली तरी बहुजन विकास आघाडीनेही उमेदवार उभा केल्यामुळे काही मतांच्या फरकाने उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. अवघ्या ९० मतांनी पराजय झालेल्या गेल्या वेळच्या शिवसेनेच्या महिला उमेदवाराला यंदा पुन्हा संधी मिळाली असली तरी विद्यमान सदस्यपद रद्द झालेल्या भाजपच्या महिला उमेदवाराचा प्रभाव मतदारांवर पडण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी शिवसेनेच्याच येथील काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उमेदवाराच्या विरोधात मते फिरवल्यामुळे त्यांना पराजय पत्करावा लागला होता.

पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक