पशू असेल त्या ठिकाणी उपचार; पथकामध्ये उपकरणांनी सुसज्ज वाहनांचा समावेश

पालघर: मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना अंतर्गत फिरत्या पशुवैद्यकीय सेवेचा जिल्ह्यतील मोखाडा व वाडा तालुक्यांना लाभ मिळणार असून १९६२ या कॉल सेंटरचा दूरध्वनी क्रमांकाच्या आधारे स्थानिक पशुपालकांना त्यांच्या आजारी पशूच्या असलेल्या ठिकाणी उपचार मिळणार आहेत.

राज्यातील पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी, गर्भधारणा तपासणी इत्यादी प्रकारच्या पशुआरोग्य सेवा पशुवैद्यकीय संस्थामार्फत नियमितपणे पुरविल्या जातात. मात्र अनेकदा पशुधन आजारी पडल्यास  पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये घेऊन जावे लागते. पशुरुग्ण जर चालण्यास सक्षम नसेल तर पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते. बहुतांशी पशुपालकांना हा आर्थिक भार परवडणारा नसतो. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवेअभावी पशुरुग्णांचा मृत्यू होऊन, पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे व त्याकरिता उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक होते.

राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासीबहुल भागामध्ये तसेच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या कमी आहे, त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा आहेत, अशा तालुक्यांमधील पशुरुग्णांना पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना अंतर्गत फिरत्या पशुवैद्यकीय पथकांची स्थापन करण्यात आलेली आहे.

पालघर जिल्ह्यतील वाडा व मोखाडा या दोन तालुक्यांत एप्रिल महिन्यापासून ही सेवा कार्यरत करण्यात आली असून दोन्ही तालुक्याकरिता फिरते पशुवैद्यक दवाखाने कार्यरत आहेत. या योजनेअंतर्गत फिरत्या पशुचिकित्सा पथकामध्ये उपकरणांनी सुसज्ज वाहन तसेच पशुवैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी आणि वाहनचालक तथा मदतनीस यांचा समावेश राहणार आहे.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना अंतर्गत फिरत्या पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याच्या हेतूने सुसज्ज चिकित्सा प्रणाली असणारी वाहने कोंकण विभागातील पालघर जिल्ह्यसह रायगड (श्रीवर्धन , माणगांव), रत्नागिरी (मंडणगड) व सिंधुदुर्ग (दोडामार्ग) या ठिकाणी कार्यरत करण्यात आले आहेत. फोन क्रमांकावर चिकित्सा सुविधा उपलब्ध होण्यासाठी  ‘१९६२‘ या क्रमांकाचे कॉल सेंटरच्या उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

पशुपालकाच्या दारात पशुवैद्यकीय सेवा

प्रसूतीसंबंधी सेवा उदा. निदान व उपचार, अवघड किंवा मंद गतीने प्रसूती, गर्भाशय / गुदद्वार बाहेर येणे, सुकलेला गर्भ/ मृत गर्भ बाहेर काढणे, शस्त्रकियेद्वारे प्रसूती, प्रथमोपचार सेवा, तातडीच्या चिकित्सकीय सेवा उदा. मिल्क फिवर, किटोसीस इ. सारखे चयापचय विकार, संसर्गजन्य विकार, प्रोटोझोन विकार, अन्न विषबाधा, आम्लाचे अपचन, पोट फुगणे, अतिसार, कीटकनाशकांमुळे झालेली  विषबाधा, वनस्पतीजन्य विषबाधा, सर्पदंश/ कीटकाचा चावा, अ‍ॅलर्जी, पक्षाघात, दुखापत, गळू, जखम, अस्थिभंग, शेपूट व शिंगाचे विच्छेदन, रुमेनोटॉमी, डोळ्यांचा कर्करोग, स्ट्रिंग हॉल्ट व इतर कोणत्याही चिकित्सकीय आपत्कालीन परिस्थितीत पुरविण्यात येणाऱ्या सेवा वैद्यकीय पथकामार्फत उपलब्ध केल्या जाणार आहेत.