पालघरमधील मुरबेतील नौकामोहिमेत दीडशे मोठे मासे हाती; औषधी गुणधर्मामुळे प्रत्येक माशाला प्रचंड भाव

पालघर : नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून मोहिमेवर निघालेल्या पालघर जिल्ह्यातील मुरबे गावातील मच्छीमारांच्या जाळ्यात घोळ प्रजातीचे दीडशेहून अधिक मोठे मासे सापडले असून त्यांच्या लिलावातून या मच्छीमारांना सव्वा कोटीचे उत्पन्न हाती लागले. घोळ माशाच्या पोटात असलेल्या ‘बोत’ या अवयवाचा उपयोग औषधे तसेच सौंदर्यप्रसाधने निर्मितीसाठी केला जात असल्याने केवळ त्या अवयवाच्या विक्रीतून या मच्छीमारांना बक्कळ मोबदला मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोळ हा मासा खाण्यासाठी चविष्ट मानला जातोच; पण त्याच्या पोटात असलेल्या ‘बोत’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिशवीला तसेच त्याच्या पंखांना चांगला दर मिळतो. या ‘बोत’चा वापर सौंदर्यप्रसाधने, लैंगिक क्षमता वाढवण्याची औषधे, शस्त्रक्रियांसाठी लागणारे औषधी धागे यामध्ये वापरला जात असल्याने त्याला जवळपास किलोमागे सुमारे अकरा लाख रुपये असा दर मिळतो. पालघर तालुक्यातील मुरबे गावातील चंद्रकांत तरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हरबा देवी या मच्छीमार नौकेला वाढवणसमोरील समुद्रात सुमारे २५ सागरी मैल अंतरावर हे घोळचे घबाड हाती लागले. या दीडशे माशांच्या पोटातून जवळपास बारा किलो वजनाचे बोत हाती लागले असून त्याचा रविवारी लिलाव करण्यात आला. त्यातून या मच्छीमारांना एक कोटी २५ लाख रुपये इतका मोबदला मिळाला. याशिवाय घाऊक बाजारात उर्वरित मासे तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रतिकिलो दराने विकले गेले.

घोळ माशाच्या या अवयवाला चीन, मलेशिया, थायलंड या देशांत प्रचंड मागणी आहे. पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टी भागात दरवर्षी हे मासे जाळ्यात सापडतात. विशेष म्हणजे, हंगामात परप्रांतीय व्यापारी पालघर पट्टय़ात आपल्या खबऱ्यांचे जाळे पेरून ठेवतात. घोळ हाती लागल्याची खबर लागताच ते जास्तीत जास्त बोली लावून घोळच्या ‘बोत’ची खरेदी करतात, अशी माहिती जाणकारांनी दिली.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Billions of rupees in fishing nets ssh
Show comments