पालघर: वैतरणा नदी पात्रात नौकानयन व रेती उत्खनन करणाऱ्यांवर महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करत सुमारे एक कोटीपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल व रेतीसाठा जप्त केला आहे.
वैतरणा पूल क्रमांक ९२ व ९३ परिसरामध्ये नौकानयन व रेती उत्खननास बंदी असतानाही सक्शन पंपाद्वारे मोठय़ा प्रमाणात अवैध रेती उत्खनन केले जाते. रविवारी वाढीव वैतरणा नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळाली. तहसीलदार सुनील शिंदे, केळवे पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश गवई, सफाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप कहाळे, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच पोलीस पथकाच्या कर्मचाऱ्यांनी उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली व बोटींना चारही बाजूने घेरले. याठिकाणी नदी पात्रातून सक्शन पंपाद्वारे अवैधरीत्या रेती उत्खनन करत असताना ५ मोठय़ा बोटी व ५ सक्शन पंप हस्तगत केले. बोटीत असलेला सुमारे ५० ब्रास रेती साठा जप्त करून पंचनामा करून सर्व रेती नदीपात्रात लोटण्यात आली. बोटी आणि इतर सक्शन पंप जाळून नष्ट करण्यात आले. या कारवाईत सुमारे रुपये एक कोटी अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तहसीलदार,पोलीस, आगरवाडी मंडळ अधिकारी राजू पाटील, पालघर मंडळ अधिकारी मनोहर वसावे, जलसार तलाठी किरण जोगदंड यांच्यामार्फत रविवारी सकाळी ११.३० वाजेदरम्यान सुरू झालेली कारवाई संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती. बोट व सक्शन पंप मालक रवि राऊत, संदीप पाटील व हरेश्वर पाटील या तिघांविरुद्ध केळवा पोलीस ठाण्यात, तर दीपेश पाटील व अरिवद पाटील यांच्याविरोधात सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Billions rupees seized sand mining operations big action vaitarna river basin revenue police amy
Show comments