डहाणू : मागील महिन्यात मच्छीमारी करताना केंद्रशासित प्रदेश दिव येथे निराली नावाच्या बोटीचा अपघात झाला होता. या अपघातानंतर पालघर जिल्ह्यातील झाई गावातील चार आदिवासी मच्छीमार बेपत्ता झाले असून यातील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या मच्छीमार कुटुंबीयांची अवस्था दयनीय असून त्यांना शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध नसल्याने ते महाराष्ट्र सह गुजरात, दिव दमण भागात जाऊन मासेमारी बोटींवर काम करतात. मागील महिन्यात ४ मार्च रोजी गुजरात सीमेलगत केंद्रशासित प्रदेश दिव दमण येथील दीव नजीकच्या वनगबार बंदरावर पालघर जिल्ह्यातील झाई गावातील आदिवासी मच्छिमार खलाशी मासेमारी करण्यास गेले होते. १६ व्या दिवशी मासे पकडून परत येत असताना एका मोठ्या बोटीला धडकून त्यांच्या बोटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात झाई येथील ४ आणि गुजरात मधील १ मच्छिमार आदिवासी बेपत्ता झाले होते. यातील गुजरात मधील एक आणि झाई येथील सुरज विलास वळवी (२३) या तरुणाचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.
बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेले झाई येथील आदिवासी मच्छीमार खलाशी यांचे कुटुंब मच्छीमारीवर उदरनिर्वाह करत असून घरातील कमावणारा व्यक्ती गेल्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र सरकार आणि दिवदमण प्रशासनाने बेपत्ता असलेल्या अक्षय वाघात, अमित सुरुम आणि सूर्या शिंगडा यांच्या कुटुंबीयांना व मयत सूरज वळवी यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करावी अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. मात्र दीड महिना उलटून देखील बेपत्ता मच्छीमारांचा शोध लागला नसून मृत मच्छीमाराच्या कुटुंबीयाला देखील अद्याप राज्य सरकारकडून कुठलीही मदत मिळालेली नसल्यामुळे शासनाच्या भुमिकेविरोधत रोष व्यक्त होत आहे.
अपघातात मयत आणि बेपत्ता खलाशांच्या कुटुंबांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून शासनाने या कुटुंबीयांना मदत आणि पुनर्वसन योजना सुरू करण्याची आवश्यकता सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. आर्थिक मदत लाभल्यास त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करता येतील. बेपत्ता व्यक्तींच्या मदतीसाठी असलेली सात वर्षाची अट कालबाह्य झालेली आहे. त्यातही सुधारणा करण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र सरकारने त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता ज्येष्ठ पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई यांनी व्यक्त केली.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण आदिवासी भागातील नागरिक रोजगारासाठी स्थलांतर करत असतात. जिल्ह्याच्या दक्षिणेकडील आणि किनारपट्टी भागातील आदिवासी कामगार महाराष्ट्र सह गुजरात आणि दीव दमण भागातील मासेमारी बोटींवर काम करण्यासाठी जातात. मात्र या खलाशी कामगारांची कोणत्याही प्रकारची नोंदणी होत नसल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. मध्यंतरी कोव्हिड काळात राज्यात ताळेबंदी लागू असताना मासेमारी बोटीवर गेलेल्या खलाशांना अनेक दिवस गुजरात राज्यात अडकून राहावे लागले होते. एकूणच उदरनिर्वाहासाठी खोल समुद्रात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मच्छीमार खलाशांना शासनाकडून कोणत्याही सुविधा, विमा आणि सुरक्षितता उपाययोजना देण्यात येत नसल्यामुळे खलाशी कामगारांच्या हितासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.