पालघर : चार ते पाच वर्षांपासून बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे भिजते घोंगडे कायम आहे. लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे साधी प्रशासकीय मान्यताही आजतागायत मिळाली नसल्याचा संताप नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. परिणामी गरजू रुग्णांना शासकीय आरोग्यसेवा दुरापास्त झाल्या असून रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.
बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या तुटपुंज्या आरोग्य सेवेमुळे हे रुग्णालय नेहमीच चर्चेत राहिले आहे. पाच वर्षांपूर्वी हे रुग्णालय एका जर्जर इमारतीत सुरू झाले होते, त्यावेळी रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी पाहणी करून ते इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार अलीकडील काळात हे रुग्णालय टीमाच्या पडक्या व गळक्या इमारतीत स्थलांतर केले आहे. मात्र येथे आरोग्य सुविधेची वानवा आहे. गाजावाजा करून आ. पाटील यांनी नवीन रुग्णालयासाठी प्रयत्न केल्याचे दाखवले. मात्र रुग्णालयासाठी प्रशासकीय मान्यता आजही रखडलेली आहे. आ. पाटील हे याकडे दुर्लक्ष करीत असून श्रेयवाद घेण्यासाठी त्यांनी देखावा केल्याचे आरोप आता बोईसरकर करू लागले आहेत. टीमामध्ये फक्त बाह्यउपचार (ओपीडी) सुरू आहेत. रुग्णालयात प्रसूती होत नसल्याने गरोदर मातांची फरफट कायम आहे. रुग्णांना साध्या उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये पदरमोड करावी लागत आहे. खासगी रुग्णालयात अवास्तव दर असल्याने सर्वसामान्यांना तो खर्च परवडत नाही.
बोईसर परिसरातील संजयनगर येथील शासकीय जागेवर तीस खाटांचे बोईसर ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आहे. त्यासाठी २२ कोटी रुपये खर्च येणार आहेत. रुग्णालयाचा प्रस्ताव प्रशासनाकडून राज्य शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र बोईसरचे आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे आजही प्रशासकीय मान्यता प्रलंबितच आहे.
‘लोकप्रतिनिधी इतर कामात व्यग्र’
आ. राजेश पाटील हे ग्रामीण रुग्णालयाच्या नावाखाली राजकीय स्टंटबाजी करत असून रुग्णालयाचे काम सोडून ते मतदारसंघात रस्ते व इतर कामांत मग्न आहेत. रुग्णालयाचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लावायला त्यांना वेळ नाही. याउलट पाठपुरावा, पत्रव्यवहार केला आहे असे ते सांगत असतील तर हा प्रश्न मार्गी का लागत नाही, असा सवाल बोईसर व परिसरातील नागरिक आता विचारू लागले आहेत.
‘पाठिंबा देऊनही सरकारचे दुर्लक्ष’
बहुजन विकास आघाडीने सध्याच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. आमदार राजेश पाटील हे याच बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. पाटील यांनी सरकारकडे व संबंधित मंत्र्यांकडे बोईसर ग्रामीण रुग्णालयासाठी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्वत: आमदारांनी विधान केल्याने बहुजन विकास आघाडीच्या आमदारांकडे हे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
रुग्णालयासाठी सततचा पाठपुरावा करत आहे, मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. येत्या अधिवेशनात पुरवणी मागणीमध्ये तरी हे काम मंजूर व्हावे अशी अपेक्षा आहे.
-राजेश पाटील, आमदार, बोईसर विधानसभा
येथील लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी जातीने लक्ष घालणे अपेक्षित आहे.
-विलास तरे, माजी आमदार, बोईसर विधानसभा