नीरज राऊत
पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असणाऱ्या एका तरुणीवर तिच्या प्रियकराने बोईसर येथे भरदिवसा गावठी कट्टय़ाने गोळीबार केला. त्यानंतर या तरुणाने स्वत: डोक्यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाल्यानंतर वाहनासमोर झेप घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बोईसरमध्ये परप्रांतीयांचा लोंढा मोठय़ा प्रमाणात येत आहे, त्यावर देखरेख ठेवणे तसेच काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याचा छडा लावण्यास पोलिसांना मर्यादा येत आहेत.
शस्त्राचा धाक दाखवून गुन्हा करण्याचा या वर्षांतील हा पहिलाच प्रसंग असला तरीदेखील यापूर्वी असे अनेक प्रकार घडले आहेत. बोईसर येथे बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दीड वर्षांपासून बोईसर औद्योगिक वसाहतीच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्या अधिकांश व्यक्तींची तक्रार घेतली जात असली तरी त्यापूर्वी परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याऐवजी इतर किरकोळ गुन्ह्यांची नोंद केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे सन २०२१ मध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच गाठली गेली आहे.
बोईसर येथे नोकरीच्या निमित्ताने परप्रांतीयांचा लोंढा दररोज येत असतो. पूर्वी स्थानक परिसरात रात्रीची गस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अशा परप्रांतीयांची नोंद केली जात असे. मात्र कोविडकाळात या पद्धतीत खंड पडला होता. सध्या ही पद्धत पुन्हा अमलात आणली असली तरी अवजड वाहनांमधून बोईसर हद्दीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या अजूनही लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे.
बोईसर पूर्वेकडील भागांमध्ये वेगवेगळय़ा कामगार वसाहतीमधील चाळींमध्ये दाटीवाटीची वस्ती निर्माण झाली आहे. अशा कामगार वस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तपशील घेण्यास चाळमालक तसेच पोलिसांसमोर मर्यादा येत आहेत. शिवाय कामगार म्हणून आलेली व्यक्ती ही सराईत गुन्हेगार आहे किंवा कसे याचा अंदाज बांधणेदेखील कठीण होत असून बोईसर पूर्वेकडील पोलिसांची गस्ती व्यवस्था मर्यादित स्वरूपात असल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर वसई तालुक्यातील नालासोपारा प्रमाणेच बोईसर येथील गुन्हेगारींचे प्रमाण वाढले आहे. गुन्हा करून आपल्या मूळ गावी किंवा देशभरात अन्य ठिकाणी पोहोचण्यासाठी दळणवळणाचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने यापूर्वी सोनाराकडील सुमारे साडेसात कोटी रुपये किमतीच्या जवाहिऱ्याचा माल लुटल्याच्या प्रकरणात अजूनही पोलिसांना छडा लागलेला नाही. शिवाय लैंगिक अत्याचार, मारहाण, खून, चोरी, दरोडे प्रकरणांत यापूर्वी नोंदवण्यात आलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास व चोरीमधील मालमत्तेची पुनप्र्राप्ती (रिकवरी) अजूनही झाली नसल्याचे दिसून येते. शहरी भागात भाडय़ाने देण्यात येणाऱ्या गृहसंकुलामधील सदनिकांमधील वास्तव्य करणाऱ्या परिवारांचे व त्यांच्या सदस्यांचे अनेकदा अधिकृतपणे नोंदणी करून त्यांची तपशीलवार माहिती संकलित करण्याची पद्धत अवलंबली जात असली तरी औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असणाऱ्या सर्व गावांमधील चाळी व दाटी-वाटींच्या वस्तीमध्ये निवास करणाऱ्याबाबत बहुतांशी माहिती नसल्याचे दिसून आले आहे.
समाजमाध्यमांचा अतिरेक वापर होत आहे. अल्पवयीन मुली पळवून नेण्याचे विद्यमान वर्षांत ५०-५५ प्रकार घडले आहेत. त्यापैकी बहुतांश अल्पवयीन मुलींना स्वगृही परतण्यास पोलिसांनी केलेले प्रयत्न यशस्वी होऊन संबंधितांविरुद्ध पॉस्को किंवा तत्सम गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. समाजमाध्यमांवरून मैत्री करणे, नंतर संबंध ठेवणे व कालांतराने काडीमोड करणे हे नित्याचे झाले आहे. अशाच पार्श्वभूमीवर गेल्या आठवडय़ातील गोळीबार व अन्य प्रकार घडल्याचे आढळून आले आहे.
बोईसर येथील पूर्वेकडील एका प्रसिद्ध गृहसंकुलात अल्पसंख्याक समाजातील काही बांधवांनी भाडय़ाच्या जागेत कटकारस्थान करण्यासाठी सदनिका घेतल्याचे प्रकार घडले होते. अशा ठिकाणी तलवारी व शस्त्रासाठा असल्याच्या देखील तक्रारी आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांकडे काही वर्षांपूर्वी केल्या होत्या. त्या वेळी प्रार्थना करण्यासाठी स्थान असल्याचे पोलिसांना थातूरमातूर उत्तर देऊन वेळ निभवण्यात आली होती.
भंगार चोरी तसेच अतिशय महागडय़ा औषध रसायन किंवा रसायनाची चोरी हा तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गुन्ह्याचा नित्याचा प्रकार घडला आहे. अशा मोठय़ा किमतीच्या चोऱ्यांमध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा सहभाग अधोरेखित असतो. अशा चोरांचा तपास सोपा व्हावा याकरिता कंपनीमधील कर्मचाऱ्यांचे सविस्तर माहिती संकलित करणे, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे असून नागरिकांमध्ये प्रबोधन करणेदेखील आवश्यक झाले आहे.
सुमारे पाच लाख लोकवस्तीवर देखरेख ठेवणाऱ्या बोईसर पोलिसांकडे अवघे ९० कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. २९ गावांमधील नागरिकांवर गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पाळत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची ही संख्या किमान २०० असावी तसेच बोईसर एमआयडीसी पोलीस चौकीची विभागणी करून पूर्वेकडील भागाकरिता स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे.
पोलिसांतर्फे यापूर्वी कोम्बिंग ऑपरेशन नियमितपणे केले जात असे. सध्या या उपक्रमाला ‘ऑपेरेशन ऑल आऊट’ असे संबोधले जात असून अशा वेळी रेकॉर्डवर असणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अनेक गुन्हेगारांच्या परराज्यातील खऱ्या पार्श्वभूमीची माहिती उपलब्ध नसल्याने असे गुन्हेगार मंडळी राजरोसपणे फिरताना दिसतात. ऑल आऊट उपक्रमासोबत परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही फुटेजचा वापर वाढला अजून रात्रीच्या गस्तीसाठी चार मोटारसायकल व चार वाहन उपलब्ध असल्याचे सध्या सांगण्यात येते. तरीसुद्धा बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याची भौगोलिक क्षेत्र व व्याप्ती पाहता रात्रीची गस्त वाढवणे व गुन्हेगारांचे तपशीलवार माहिती संकलित करण्याचे आव्हान पोलीस दलासमोर आहे. बोईसरमध्ये विविध कारणास्तव दाखल होणाऱ्या बाहेरगावच्या मंडळींचा तपशील गोळा ठेवणे व नियमितपणे कोिम्बगसारखे प्रकार करणे हाच गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी मार्ग असून याकरिता जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ या कामी वापरणे आवश्यक आहे. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम बनवण्यासाठी देखील वाव असून पूर्वेकडील भागात नव्याने पोलीस ठाणे उभारणे किंवा पोलिसांचे जाळे अधिक सक्षम करणे आवश्यक झाले आहे.