वाडा : वाडा तालुक्यातील सापरोंडे – मांगाठणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच शोभा सुनील गोवारी यांना १९ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडुन अटक केली आहे. या झालेल्या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्वाची दुवा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार किती फोफावल्याचे जिवंत उदाहरण पहावयास मिळाले आहे.
ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी दोन टक्के प्रमाणे एकूण २० हजारांची लाच मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. तालुक्यात सरपंचावर कारवाई होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वी महसूल आणि पोलीस विभागातील लाचखोरीची उदाहरणे वाडा तालुक्यात पाहण्यास मिळत होती. मात्र आता ग्रामपंचायत स्तरावरील लाचखोरीची उदाहरण पाहण्यास मिळाले आहे.
वाडा तालुक्यातील सापरोंडे – मांगाठणे हि एक प्रतिष्ठेची ग्रामपंचायत समजली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये तथाकथित जिजाऊ संघटना पुरस्कृत सरपंच शोभा सुनील गोवारी कार्यरत होत्या. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी दोन टक्के प्रमाणे एकूण २० हजारांची लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली अशी तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाककडे सरपंच यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता सरपंच यांनी २० हजारांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार (शुक्रवारी) कारवाईसाठी सापळा रचण्यात आला यावेळी तक्रारदार हे लाचेची रक्कम आरोपी सरपंच शोभा गोवारी यांना देण्यासाठी गेले असता सरपंच शोभा गोवारी यांनी तक्रारदार यांच्याकडून तडजोडी अंती १९ हजारांची लाचेची रक्कम स्वीकारल्याचे लाच लुचपत प्रतिबंध विभागाने प्रसिद्धी पत्रकार नमूद केले आहे. तसेच सरपंच शोभा गोवारी यांची अंग झडतीमद्ये १९ हजारांची लाचेची रोकड मिळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. शोभा गोवारी यांच्या विरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक संतोष अंबिके, महीला पोलीस हवालदार शेख, विशे, सुरवडे यांच्या पथकाने केली.
शोभा सुनील गोवारी यांची पार्श्वभूमी
सापरोंडे – मांगाठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गोवारी १६ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदी परिवर्तन पॅनलमधून निवडून आल्या होत्या. मात्र सरपंच त्यांनी अवघ्या तीन ते चार महिन्यात जिजाऊ संघटनेमध्ये पक्षात प्रवेश केला. २०२४ विधानसभा निवडणूक वेळी सरपंच शोभा गोवारी यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थित गळ्यात प्रवेशाची माळ घालून पक्षांतर केले होते. या पार्श्वभूमीवर शोभा गोवारी ह्या नक्की कोणत्या पक्षाच्या आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस ठाण्याच्या परिसरात जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी
शोभा गवारी यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने लाच घेताना पकडल्याने त्यांना वाडा पोलीस ठाण्यात कारवाईसाठी आणले असता यावेळी वाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याची दिसून आले होते.