निखिल मेस्त्री
पालघर: विविध प्रकारच्या दस्तनोंदणीद्वारे शासनाला महसूल मिळवून देण्यात अव्वल स्थानी असणाऱ्या पालघर दुय्यम निबंधक दस्त नोंदणी कार्यालयाला (रजिस्ट्रेशन कार्यालय) भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) दर्जाहीन इंटरनेट सेवेचा फटका बसत आहे. यामुळे शासनाला प्रचंड महसुलीचा तोटा होत आहे.
दस्त नोंदणी करण्यासाठी नोंदणी रक्कम भरल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने पक्षकार व साक्षीदार यांची निबंधकांच्या समक्ष नोंदणी केली जाते. ही दस्त नोंदणी करताना प्रत्येकी टोकन दिल्यानंतर त्याची माहिती व छायाचित्रे, हातांच्या बोटांचे ठसे संगणकावर ऑनलाइन पद्धतीची (अपलोड) भरावी लागते. त्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. मात्र सेवा दर्जाहीन असल्यामुळे दस्तकारांची मोठी गैरसोय होत आहे.
महिन्यातून दहा ते पंधरा वेळा दिवसभर इंटरनेट सुविधा खंडित होत असते. त्यामुळे त्यादिवशी टोकन मिळालेल्या पक्षकारांना दस्त नोंदणी न करताच परतावे लागते किंवा इंटरनेट येईपर्यंत तासनतास ताटकळत उभे राहावे लागते.
दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी दस्त नोंदणीसाठी आलेल्या पक्षकारांना चार ते पाच तास इंटरनेटअभावी खोळंबून राहावे लागले. दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अनेक तक्रारी केल्यानंतरही दुपापर्यंत सेवा सुरू झाली नाही. पालघर दुय्यम निबंधक कार्यालयात एका महिन्याला विविध प्रकारचे पाचशे ते सहाशे दस्त नोंदणी होत आहेत. या दस्तनोंदणीतून दरमहा पाच कोटी रुपयांपेक्षा अधिकचा महसूल शासनाला प्रत्यक्षात मिळतो. इंटरनेट सेवा दर्जेदार व सुरळीत सुरू राहिली तर दस्त नोंदणी तसेच त्यातून मिळणारा महसूल वाढण्याची शक्यता आहे. मात्र भारत संचार निगमच्या दर्जाहीन इंटरनेट सेवेला सर्वजण कंटाळलेले आहेत. त्यामुळे शासनाचे नुकसानही होत आहे.
तक्रारींची नोंद : इंटरनेटचा खोळंबा होत असलेल्या दिवसाची नोंदवहीच दुय्यम निबंधक कार्यालयाने तयार करून ठेवली आहे. त्यात सेवा विस्कळीत व खंडित झाल्याच्या तारखा, वेळा याची जंत्रीच दिसून येते. यावरून भारत संचारच्या दर्जाहीन सेवेचे दर्शन घडून येते.
विवाह नोंदणीतील अडथळे
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसोबतच विवाह नोंदणीही केली जाते. इंटरनेटचा खोळंबा होत असल्याने विवाह नोंदणीसाठी आलेले वर-वधू पक्षकार यांनाही दिवसभर ताटकळत बसावे लागते. इंटरनेट सुरू झाले तर नोंदणी होते अन्यथा दुसऱ्या दिवशी ती नोंदणी केली जाते. त्यामुळे निबंधक कार्यालयातही भारत संचारच्या या कारभारापुढे हतबल आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच सेवा पूर्ववत केली जाईल. – एस.एल.मसुरकर, विभागीय अभियंता, भारत संचार निगम लि. पालघर
‘बीएसएनएल’च्या दर्जाहीन इंटरनेट सेवेचा निबंधक कार्यालयाला फटका; शासनाच्या महसुलात घट
विविध प्रकारच्या दस्तनोंदणीद्वारे शासनाला महसूल मिळवून देण्यात अव्वल स्थानी असणाऱ्या पालघर दुय्यम निबंधक दस्त नोंदणी कार्यालयाला (रजिस्ट्रेशन कार्यालय) भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) दर्जाहीन इंटरनेट सेवेचा फटका बसत आहे.
Written by निखिल मेस्त्री
Updated:
First published on: 10-05-2022 at 00:07 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsnl substandard internet registrar office decline government revenue amy