बोईसर : मुंबई-अहमदाबाद अती जलद रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या कामात पालघर जिल्ह्यने चांगलाच वेग घेतला आहे. पालघर जिल्ह्यत जवळपास ९० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत जागेच्या संपादनाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून लवकरात लवकर जमिनीवरील प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ५०८ किमीचे अंतर अवघ्या २ तासांत पार करण्याची क्षमता बुलेट ट्रेनमध्ये आहे. जिल्ह्यत बुलेट ट्रेन मार्गासाठी एकूण ४३१ हेक्टर खासगी आणि वन जागेची गरज लागणार असून यापैकी आतापर्यंत ९० टक्के म्हणजेच ३८८ हेक्टर जागेचे संपादन पूर्ण करण्यात आले असून यापैकी ६५ टक्के जागा प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात आली आहे. तर उर्वरीत जागेचे संपादन करण्याची प्रक्रिया पालघर जिल्हा प्रशासनाकडून वेगाने केली जात आहे. २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि अहमदाबाद या दोन मोठय़ा शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा करून २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सुरुवातीपासूनच पालघर जिल्ह्य़ातील शेतकरी आणि संघटनांचा या प्रकल्पास प्रखर विरोध होऊ लागल्याने बुलेट ट्रेनच्या भूसंपादनास ब्रेक लागला होता.
या मार्गासाठी भूसंपादनाचे अनेक अडथळे पार करत आत्ता खऱ्या अर्थाने बुलेट ट्रेनच्या कामाने वेग घेतला असून ज्या भागातून हा मार्ग जात आहे तेथील जागेला आता सोन्याचा भाव आला आहे. या भागात अनेक मोठे उद्योगधंदे, पायाभूत प्रकल्प, पर्यटन उद्योगामध्ये वाढ होणार असल्याने यामुळे भविष्यात पालघर जिल्ह्यच्या सर्वांगिण विकासाला मोठी चालना मिळणार आहे, असे म्हटले जात आहे.
भूसंपादनाची सद्यस्थिती
- पालघर जिल्ह्यत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी वन आणि सरकारी जमिनीचे १०० टक्के जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात आले आहे तर खासगी जमिनीपैकी वसई तालुक्यात एकूण ३७ हेक्टर खासगी जागेपैकी २१ हेक्टर जागेचे संपादन पूर्ण झाले असून १६ हेक्टर जागेचे संपादन शिल्लक आहे.
- पालघर तालुक्यात ७० हेक्टर खासगी जागा बाधित होणार असून यापैकी ६० हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. १० हेक्टर जागेचे संपादन शिल्लक आहे.
- डहाणू तालुक्यातील ४० हेक्टर खासगी जागेपैकी एकूण २९ हेक्टर जागेचे भूसंपादन पूर्ण झाले असून ११ हेक्टर जागेचे संपादन बाकी आहे.
- तलासरी तालुक्यात एकूण ३३ हेक्टर खासगी जागा लागाणार असून त्यापैकी २७ हेक्टर जागा संपादित करण्यात आली असून ०६ हेक्टर जागेचे संपादन बाकी आहे.
तलासरी व डहाणू तालुक्यातील बुलेट ट्रेनसाठी संपादित होणाऱ्या खासगी जमिनींच्या मालकांनी भूसंपादनाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून स्वत:हून सहकार्य करणाऱ्या बाधित जमीन मालकांना शासनाकडून घोषित चार पट मोबदल्याऐवजी आणखी एक पट वाढीव असा एकूण पाच पट मोबदला देण्यात येत आहे. त्यामुळे जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांनी आपले कागदपत्रे कार्यालयात जमा करून मोबदला घ्यावा.
-सुरेंद्र नवले, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, डहाणू – तलासरी