विनायक पवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोईसर : बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी  ६० हजारे झाडे आणि कांदळवनाची कत्तल करण्यात येणार आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात निसर्गाचा विनाश करून जबरदस्तीने लादण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागण्याची भीती पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच या प्रकल्पाला देशातील सर्व विरोधी पक्ष, पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध करून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. प्रकल्पामुळे शेतजमिनीसोबतच  पर्यावरणाची देखील प्रचंड हानी होणार आहे. या मार्गावरील मुंबई-बांद्रा-कुर्ला संकुल ते शिळफाटा दरम्यान असा २० किमीचा भुयारी मार्ग करण्यात येणार असून तो ठाणे खाडीच्या तळाशी ४० मीटर खोलवर असणार आहे. त्याचप्रमाणे मोरी, बापाने, वाकीपाडा, जीवदानी डोंगर, काकडपाडा आणि आंबेसरी या गावात देखील असे मार्ग खोदण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावरील मिठी नदी, ठाणे खाडी, उल्हास नदी आणि वैतरणा नदी हा सर्व भाग सीआरझेड क्षेत्रात येत असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाणे खाडी, उल्हास नदी खाडी, तुंगारेश्वर अभयारण्य, वैतरणा नदी खाडी, डहाणू तालुका पर्यावरण संरक्षित क्षेत्र सारख्या पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील आणि वन्यजीव अधिवास क्षेत्रात समाविष्ट असल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल ६० हजार झाडांवर कुऱ्हाड चालवली  जाणार असून ३२ हेक्टर जागेवरील अतिसंरक्षित कांदळवन देखील नष्ट होणार आहेत. दरम्यान, पालघर जिल्हा हा सागरी, नागरी आणि डोंगरी असा असून नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असून. केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन, या प्रकल्पामध्ये ६० हजार झाडे तोडली जाणार असल्याने नैसर्गिक साधन संपत्तीचा प्रचंड ऱ्हास होणार असून ती कधीही भरून न येणारी हानी आहे. याचे खूप मोठे नुकसान भविष्यकाळात पालघर जिल्ह्यातील जनतेला सोसावे लागणार आहे, अशी भीती बोईसरचे पर्यावरणतज्ज्ञ चिराग दुर्ग यांनी व्यक्त केली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bullet train project threatens environment 60 thousand trees forest slaughtered ysh