वाडा: आज शुक्रवारी (८ सप्टेंबर) सकाळी पावणेसात वाजता चिंचपाडा – वाडा या बसचा एका वळणावर समोरून आलेल्या ट्रकला धडक बसल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात ४७ विद्यार्थी व ८ प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये विद्यार्थ्यांसह ७० प्रवासी होते.
चिंचपाडा येथून सकाळी सव्वासहा वाजता ही बस वाड्याच्या दिशेने येत होती. वाडा येथील पी.जे. हायस्कूल व स्वामी विवेकानंद या दोन्ही माध्यमीक शाळांची वेळ सकाळीच असल्याने चिंचपाडा, पीक, शिलोत्तर, देवळी, मानिवली या परिसरातील ५६ शालेय विद्यार्थी या बसमधून प्रवास करीत होते. या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य १४ प्रवासी या बसमध्ये होते. वाड्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या देसई नाका येथील वळणावर हा अपघात झाला.
हेही वाचा – चोर समजून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू, उमरोळी परिसरातील तिघांना अटक
हेही वाचा – पालघर : देहाळे येथे मासे पकडण्यास गेलेल्या दोन महिलांचा नदीत वाहून मृत्यू
विद्यार्थी आणि प्रवाशी बेसावध असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडाला, दातांना व डोक्यावर जबर मार लागला आहे. सुदैवाने या अपघातात अति गंभीर कुणीही नाही. मात्र मुका मार व अनेक जखमा झालेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. दरम्यान अपघाताची बातमी समाजमाध्यमातून सर्वत्र पसरताच पालक, शाळांचे शिक्षक, पोलीस, एसटी आगाराचे कर्मचारी यांनी वाडा ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन गंभीर जखमींना सामान्य रुग्णालय ठाणे तसेच काही जखमींना खासगी रुग्णालयात स्थलांतर करण्यात सहकार्य केले.