लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : दिल्ली ते संजाण (गुजरात) दरम्यान कार्यरत असणाऱ्या समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग (डीएफसी) सफाळ्यापर्यंत कार्यरत होण्यासाठी असणारा नवली (पालघर) व सफाळे रेल्वे फाटकांचा अडथळा आठवडाभरात दूर होणार असून डीएफसी मार्ग पालघर जिल्ह्यात फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावरून दररोज प्रत्येक दिशेला २० मालगाड्या किमान धावण्याची शक्यता आहे. यामुळे उपनगरीय क्षेत्रातील मालगाड्यांचे प्रमाण कमी होणार असून आगामी काळात उपनगरीय सेवा वाढवण्यासाठी वाव राहणार आहे.
लोकसभा २०२४ च्या निवडणुकांपूर्वी गुजरात राज्यातील संजाण पर्यंत डीएफसी मार्ग कार्यान्वित करण्यात आला होता. त्याच वेळेला सफाळा रेल्वे स्थानकापर्यंत असणारा डीएफसी मार्ग कार्यरत करण्याचे देखील विचाराधीन होते. त्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक चाचणी व तयारी पूर्ण झाली होती. मात्र नवली (क्र. ४६) व सफाळे (क्र. ४२) येथील रेल्वे फाटक बंद करण्यासाठी पर्यायी पुलांची उभारणी होऊ न शकल्याने व नागरिकांचा फाटक बंद करण्यास विरोध राहिल्याने हा समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग कार्यान्वित होण्यास विलंब झाला होता.
पालघर व सफाळे ग्रामस्थांनी उड्डाणपूल कार्यरत न झाल्याने फाटक बंद करण्याला विरोध दर्शवला होता. पालघर येथे अतिरिक्त सायडींग (लूप) रेल्वे लाईन टाकण्याची गरज भासल्याने नवली फाटकावरील रेल्वे उड्डाणपुलाची रचना बदलण्यात आली. त्यामुळे या फाटकांमधून होणाऱ्या प्रवासी वाहतूकला सोईस्कर पर्याय नसल्याने नागरिकांनी विरोध केला होता. तर सफाळा येथे फक्त एक पादचारी पूल असल्याने अतिरिक्त पुलांची मागणी करण्यात आली होती.
नवली उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून सफाळे येथे दोन नवीन पादचारी फुल उभारण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे नागरिकांचे मत लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाने नवली व सफाळे फाटक बंद करण्यास ना हरकत दिली आहे. या अनुषंगाने सफाळे व नवली येथील फाटक बंद करण्यासाठी सात दिवसांची नोटीस देण्यात येणार असून १२ फेब्रुवारी नंतर ही दोन्ही फाटक बंद करून समर्पित मालवाहू मार्ग मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे डीएफसी सूत्रांकडून सांगण्यात आले.
सद्यस्थितीत दिल्ली ते संजाण (न्यू घोलवड) पर्यंत समर्पित मालवाहू रेल्वे कार्यरत असून पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकालगत डीएफसी व पश्चिम रेल्वे यांच्यात रुळ, विद्युत जोडणी करणे तसेच सिंगल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू असून त्याच्या पूर्व तयारीसाठी आठवडाभराचा अवधी लागणार आहे. हे बदलाचे काम प्रत्यक्षात एका दिवसात पूर्ण होणार असून त्यानंतर मालगाड्यांची वाहतूक करण्यासाठी डीएफसी रेल्वे मार्ग सक्षम राहील असे सांगण्यात आले. या कामी खासदार इतर लोकप्रतिनिधी व नागरिकांचे सहकार्य लाभल्याने डीएफसी ने त्यांचे आभार मानले आहेत.
पश्चिम रेल्वेवरील मालगाड्यांचा भार होणार कमी
सद्यस्थितीत सफाळा ते संजाण दरम्यान दोन्ही दिशेला प्रत्येकी २० मालगाड्या धावतील असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे इतका भार पश्चिम रेल्वेच्या मुख्य वाहिनीवरील कमी होणार आहे. सफाळे ते जेएनपीटी दरम्यान डीएफसी मार्गीकेचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर माल गाड्यांची संख्या वाढणार तसेच डबल डेकर मालगाड्या सुरू होतील असेही समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाच्या व्यवस्थापनाकडून लोकसत्ता ला सांगण्यात आले.