लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या क्रीडा संकुलतील तरण तलावात बुडून लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मृत्यूप्रकरणी अखेर पोलिसांनी ठेकेदार व व्यवस्थापकासह सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद समाजात उमटले असून पालिकेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले जात आहेत.
मिरा भाईंदर महापालिकेच्या क्रिडा संकुलातील तरण तलावात ग्रंथ मुथा (११) या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. या संदर्भात मुलाचे वडील हसमुख मुथा यांनी दिलेल्या तक्रारी वरून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये संकुल चालविणाऱ्या साहस चॅरिटेबल संस्थेचा मालक,व्यवस्थापक आणि चार जीव जीवरक्षकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणा बाळगल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा त्यांवर आरोप आहे.त्यानुसार पोलिसांनी तपास करण्याच्या हेतूने क्रीडा संकुलातील कॅमेरे व इतर गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत.तर पोलिसांचा तपास पूर्ण होऊ पर्यंत क्रीडा संकुल बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
ठेकेदाराला केवळ नोटीस
महापालिकेच्या क्रीडा संकुलातील तरणतलावात लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाला संकुलाच्या सुरक्षेबाबत जाग आली आहे.त्यावरून प्रशासनाने कंत्राटदाराला कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली असून २४ तासात खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर सध्या महापालिकेकडे पुराव्यासाठी काहीच नसल्यामुळे पोलिसांच्या अहवालानंतर कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया समाज विकास अधिकारी दिपाली पोवार-जोशी यांनी दिली आहे.
मनसेकडून पालिकेची अंत्ययात्रा
मिरा भाईंदर महापालिकेचे क्रीडा संकुल हे राजकीय नेत्यांशी जवळीक असलेल्या व्यक्तीला चालवण्यास देण्यात आले आहे.परिणामी कोणताही अनुभव नसलेल्या व्यक्तीकडून हे संकुल चालविले जात असल्याने सुरक्षेचा दुष्टीने आवश्यक असलेल्या खबरदारीकडे पूर्णतः पाठ फिरवण्यात आली आहे. त्यामुळे मरण पावलेल्या मिरा भाईंदर महापालिकेच्या भूमिकेची अंत्ययात्रा काढत मनसे पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयात आंदोलन केले.
नागरिक एकवटले
क्रीडा संकुलात मुलाच्या मृत्यूच्या घटनेचे समाजात तीव्र पडसाद उमटू लागले आहे.याबाबत शहरातील नागरिक, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन आंदोलन उभे केले आहे. यात संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची प्रमुख मागणी ठेवण्यात आली आहे.