डहाणू/कासा : एमबीबीएसच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर मला शारीरिक सुख हवं, असं सांगून विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघरच्या डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांत मेडिकल कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्याद देणारी २१ वर्षीय विद्यार्थिनी ही मूळची नागपूर येथील असून ती डहाणूतील वेदांत वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचं शिक्षण घेत आहे.
हेही वाचा – भाजपच्या वर्तणुकीमुळे शिंदे गटातील अस्वस्थतेला धुमारे
यापूर्वी देखील आरोपी प्राचार्याने अशाच पद्धतीने या तरुणीची फोनवरून आणि प्रत्यक्ष छेड काढली असून, यासंदर्भात या पीडित विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या प्रशासनाला लेखी तक्रारदेखील केली होती. मात्र तरीदेखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती पीडित विद्यार्थिनीने आपल्या फिर्यादीत दिली आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनंतर कासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० च्या ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.