वाहतूक कोंडीसह अपघाताची भीती; वाहनचालकांचा जीव मुठीत
डहाणू: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुभाजकादरम्यान ठाण मांडून राहणाऱ्या गुरांमुळे दिवसा वाहतुकीची कोंडी तर होतेच शिवाय रात्र-अपरात्री या गुरांमुळे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. पहाटेच्या सुमारास ही भटकी गुरे उधळत असल्याने दुचाकी चालकांची त्रेधा उडत असून प्रसंगी अपघातही घडत आहेत.
अनेकदा महामार्गावरच बैलांची झुंज लागते अशावेळी सर्वानाच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रात्री तर गुरांचा सर्वाधिक धोका वाहनधारकांना असतो. कारण कित्येकदा गुरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने सुसाट वेगाने येणाऱ्या गाडय़ांना अशा गुरांमुळे जीवास मुकावे लागते. या धोकादायक परिस्थितीत या गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने होत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणू, तलासरी, पारडी दरम्यान दुभाजकामध्ये हिरवळीवर वावरणाऱ्या मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्गावर मोकाट गुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्रामपंचायतीकडे कोंडवाडय़ाची सोयच उपलब्ध नसल्याने अशा गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई होत नाही. परिणामी बाजारपेठेतील मोकाट गुरांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात ही गुरे रात्रीच्या वेळी आसऱ्यासाठी बाजारपेठेतील दुकानांच्या पडवीसमोर ठाण मांडतात. सकाळी दुकान उघडताना बाहेरचा परिसर शेनाने बरबटत असल्याने दुकानदारांचा त्रास वाढतो. एखाद्या वेळेस अपघाताने गुरांना मार लागल्यास भरपाईसाठी त्यांचे मालक लागलीच हजर होतात. परंतु इतर वेळी या गुरांची जबाबदारी घेत नाहीत. याबाबत आयआरबी ठेकेदार बी. राव, अधिकारी यांनी मोकाट गुरांबाबत आपण अनेकदा याबाबत जिल्हाधिकारींना पत्रव्यवहार केला आहे. डहाणू, तलासरी, पारडी या भागांतील तक्रारी जास्त आहेत, असे सांगितले.