नीरज राऊत
उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न काही काळ ऐरणीवर आला होता. गेल्या आठवडय़ात चारोटीजवळील धानिवली येथे अन्य एका अपघातात कल्याण येथील एकाच कुटुंबातील तीन प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला होता. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांनंतर त्या मागील कारणांचा शोध घेताना वेगमर्यादेचे उल्लंघन अर्थात ओवरस्पीिडग असणारे वाहन अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जाते. महामार्गाच्या ११० किलोमीटरच्या पालघर जिल्ह्यातील पट्टय़ात अनेक ठिकाणी वाहने भरधाव जात असताना काही ठिकाणीच अपघात का होतात याचा मात्र शोध घेतला जात नाही.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची रचना करताना तसेच हा महामार्ग चौपदरी व सहापदरी करताना गाडय़ांची वेगमर्यादा ८० किलोमीटर प्रति तास याचा आधार घेण्यात आला आहे. अलीकडच्या काळात अद्यावत सुविधांनी सुसज्ज असलेली वाहने उपलब्ध झाली असून रस्त्यांची स्थिती तुलनात्मक सुधारल्याने तसेच महामार्गावरील मार्गिका रुंद झाल्याने वाहनांचा वेग शासनाने दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असतो याबाबत शंका नाही.
२०१५च्या सुमारास या महामार्गावर ८४ अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) असल्याचे एका अहवालाच्या आधारे वृत्त प्रसिद्ध झाले होते. प्रत्येक अपघातप्रवण क्षेत्राच्या ५०० मीटर अलीकडे दोन्ही बाजूने त्यासंदर्भात सावधगिरीची सूचना देणारे तसेच वेगमर्यादा नमूद करणारे फलक बसविणे आवश्यक आहे. या सूचनांचा ढोबळपणे विचार झाला तर प्रत्येक अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असे फलक झळकणे अपेक्षित असते. असे झाले तर वेगमर्यादा राखणे सोयीचे ठरेल.
वेगाने धावणाऱ्या वाहनांचे समोरासमोर अपघात घडल्याचे प्रकार कमी असून पुढे धावणाऱ्या वाहनांचा अचानक पणे वेग कमी होणे, चुकीच्या मार्गिकेवरून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणे, रस्ता अचानक निमुळता होणे किंवा रस्ता दुभागला जाणे ही करणे आहेत. त्याबरोबर रस्त्यावर असणारा मोठा खड्डा चुकवणे. बेकायदा क्रॉसिंगच्या ठिकाणाहून दुचाकी किंवा वाहन, अचानकपणे येणारी जनावरे चुकविण्यासाठी वाहन मार्गिका बदलणे किंवा वेग कमी करणे यामुळे अपघात घडत असतात. याखेरीज महामार्गावर अनेकदा वाहने नादुरुस्त होत असून मार्गिकेच्या मधोमध बंद अवस्थेमध्ये उभी राहात असल्याने त्याला चुकवण्याचा प्रयत्न अपघात होताना दिसतात. याखेरीज महामार्गाच्या उभारणीच्या वेळी जागेच्या उपलब्धतेच्या मर्यादेमुळे किंवा सदोष रचनेमुळे अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. महामार्गाच्या काही भागात असणारी एक मार्गिका लगतच्या पेट्रोल पंप, सीएनजी गॅस पंपवर जाणाऱ्या वाहनांनी किंवा हॉटेलबाहेर उभ्या राहणाऱ्या वाहनांच्या पार्किंगने व्यापली असतात. तर काही ठिकाणी भोजन वा आरामासाठी रस्त्याकडेला ट्रक उभे केल्याने मार्गिका अचानकपणे अरुंद होऊन अपघात होण्यास कारणीभूत ठरतो.
वाहनांच्या आकार व ते वाहात असलेल्या वजनानुसार मार्गिकेची निवड करणे व त्यांची वेगमर्यादा राखणे हे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र या नियमांचे महामार्गावर सर्रास उल्लंघन होत असून अशा दोषी चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर वाहनांच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर बसवण्याची आवश्यकता असताना तसे नसल्यास अंधार असणाऱ्या भागात अपघात होण्यास कारणीभूत ठरते. अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तरी निदान तातडीने प्रकाशयोजना उभारण्याचे, क्रॅश गार्ड वा बॅरिकेड बसवण्याचे सूचित करण्यात आले होते. त्याची गांभीर्याने अंमलबजावणी होत नसल्याचे देखील दिसून आले आहे.
राज्याच्या लगत असणाऱ्या केंद्रशासित प्रदेशाच्या ठिकाणी तुलनात्मक स्वस्त मिळणारे मद्य सेवन करून किंवा राज्याच्या सीमा भागात हिवाळय़ानंतर मिळणारी ताडी पिऊन वाहन चालवणाऱ्या मंडळींची संख्या मोठी असून त्यांच्याकडून अपघात घडत असतात. मात्र अशा चालकांची मद्यपान सेवन केल्याचे तपासणी करण्याचे तपासणी नाका वा टोल नाका येथे व्यवस्था नसल्याने मद्यपान करून वाहन चालवणारी मंडळी मोकाट राहिली आहे.
अपघातग्रस्त वेळी वाहनांना सेवा देण्यासाठी पेट्रोिलग व्हॅन, क्रेन तसेच रुग्णवाहिकेची कार्यक्षम सेवा अपेक्षित असताना टोल वसुली होणाऱ्या रस्त्यावर पुरेशा प्रमाणात मूलभूत सुविधा नसल्याने अपघात झाल्यानंतर देखील प्रथमोपचार किंवा गंभीर रुग्णांचे तातडीने व्यवस्थापन करण्यास यंत्रणा सक्षम नसल्याचे अनेक अपघातादरम्यान दिसून आले आहे.
सर्वसाधारणपणे अपघातांची नोंद होताना महामार्गाच्या रचनेतील दोष, अकस्मातरीत्या येणारे अडथळे किंवा इतर कारणांचा उल्लेख न करता प्राथमिकपणे भरधाव वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला अशा नोंदी केल्या जात असल्याने अधिकांश अपघातांचे खापर वाहनचालकावर फोडण्यात येते. त्याऐवजी वाहनाच्या वेगात अचानकपणे बदल करण्यास भाग पडणाऱ्या व्यवस्थेचा अभ्यास करून त्याबाबतचा उल्लेख करण्यासाठी संबंधित यंत्रणेमध्ये जागरूकता निर्माण करणे व त्यामध्ये आवश्यक ते बदल करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. वाहनचालकांनी केलेले मद्यपान तसेच मार्गिका नियमांच्या उल्लंघनाबाबत वेगमर्यादेच्या नियंत्रणात सोबत तितक्याच प्रखरपणे व तत्परतेने केल्यास महामार्गावरील अपघातांच्या संख्येत नियंत्रण होऊ शकेल. महामार्गावरील टोल वसुलीचा कार्यकाळ संपल्यानंतर ब्लॅक स्पॉटचे निर्मूलन करण्यासाठी टोल वसुली आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात ब्लॅक स्पोट किंवा अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी रचनात्मक बदल किंवा इतर व्यवस्था उभारण्यात लक्षणीय प्रमाणात खर्च होत नसताना टोल मुदतवाढीबाबत प्रशासकीय भूमिका सर्वसामान्य वाहनचालकांच्या मनातील अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
उणिवा कायम
महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व तत्सम विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अपघातांची माहिती संकलित करण्यासाठी एकात्मिक रस्ता अपघात डेटाबेस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात पोलीस, परिवहन विभाग, आरोग्य विभाग तसेच रस्त्याची उभारणी करणाऱ्या बांधकाम किंवा तत्सम विभागाचा सहभाग अपेक्षित आहे. सद्य:स्थितीत या कार्यात पोलिसांव्यतिरिक्त इतर कुठल्याही विभागाचे विशेष योगदान नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय पोलिसांकडून होणाऱ्या अपघाताच्या ठिकाणाच्या नोंदी वेगवेगळय़ा संदर्भीय पद्धतीने केल्या जात असल्याने अपघाताचे नेमके ठिकाण किंवा चेनेजबाबत तपशील उपलब्ध नसल्याने अशी ठिकाणांची माहिती संकलित करण्यास मर्यादा येत आहेत. शिवाय अपघातानंतर अनेकदा खासगी रुग्णालयात रुग्णांना दाखल केले जात असल्याने त्यांचा तपशील व त्यांची पाठपुरावा अंतर्भूत करण्याची या उपक्रमात सध्यातरी व्यवस्था नसल्याने त्यातील उणिवा स्पष्ट झाल्या आहेत.