सखल जागेत रासायनिक कचरा; विहिरी, कूपनलिकांचे पाणी दूषित, आरोग्यावर दुष्परिणाम
पालघर : पालघर नगर परिषद हद्दीलगत असणाऱ्या पिडको औद्योगिक वसाहतीमध्ये मोकळ्या व सखल जागेत रासायनिक घनकचरा टाकला गेल्याने त्याला कृत्रिम रासायनिक तलावाचे स्वरूप आले आहे. जमलेले पाणी जमिनीत मुरत असल्याने परिसरातील विहिरी, कूपनलिकेचे पाणी दूषित झाले असून परिसरातील शेती- बागायतीवर परिणाम झाला आहे.
जिल्हा परिषद व पोलीस अधीक्षक कार्यालयालगत असलेल्या लोकमान्य नगर-अल्याळी भागातील औद्योगिक वसाहत परिसरात काही मोकळे भूखंड असून परिसरात झालेल्या औद्योगिक व इतर बांधकामांमुळे हा भाग सखल झाला आहे. कंपनीतून निघणारे रासायनिक सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतींमधील इतर उद्योगांकडून घातक घनकचरा टाकला गेला आहे. चक्रीवादळदरम्यान झालेल्या पावसात येथे पाणी साचले आहे. सुमारे ७० फूट लांबी व रुंदीच्या क्षेत्रफळाचे दोन मोठे तलाव निर्माण झाले आहेत. वसाहतीमध्ये प्रवाह नसलेल्या प्रवाहहीन नाल्यांना योग्य खोली नसल्याने त्यामध्येदेखील रासायनिक पाणी साचले आहे. शेती व भाजीपाला लागवडीवर परिणाम होऊन अनेक झाडांची वाढ खुंटली आहे. तर काही झाडे या पाण्यामुळे मृत पावली आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी नगर परिषदेकडे व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या असल्या तरी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उपायोजना न केल्यास विष्णुनगर, घरतवाडी, अल्याळी, लोकमान्यनगर व परिसरातील शेकडो गृहसंकुलांच्या कूपनलिकेच्या पाण्यावर परिणाम होण्याची भीती आहे.
रात्री वायुगळतीचा त्रास
या भागात काही कारखान्यांतून गुरुवार, शनिवार व रविवार रात्री असे आठवडय़ातून दोन- तीन वेळा उग्र वास असलेल्या वायूची गळती केली जाते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, डोळ्यांत झोंबायला लागणे व घशामध्ये खवखवणे असा त्रास होतो. शासकीय अधिकाऱ्यांची सुट्टी किंवा आठवडाअखेर पाहून वायुगळती केली जात असल्याचे नागरिकांची तक्रार आहे.