मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास चारोटी नजीक रसायन वाहतूक करणारा टँकर उलटून अपघात झाला आहे. यामध्ये टँकर मधून रसायनाची मोठ्या प्रमाणात गळती झाली असून महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

गुजरात कडून मुंबई कडे निघालेल्या टँकर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती देण्यात येत आहे. टँकर मध्ये कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारी प्रसाधने बनवण्यासाठी लागणारे व्हाईट केमिकल असल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. मात्र या रसायनाला डिझेल सारखा उग्र वास येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून रसायन घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही मालवाहू वाहन चालकांनी हे रसायन डिझेल असल्याचे गृहीत धरत वाहनांमध्ये भरून घेतले आहे. दरम्यान हे रसायन डिझेल नसल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा… Pune Rain Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा ऐनवेळी रद्द; ‘हे’ दिलं कारण!

महामार्गावर टँकर मधील रसायन गळती झाल्यामुळे काही काळ दोनही वाहिन्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यांनतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून वाहन बाजूला काढण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.