लोकसत्ता वार्ताहर

पालघर : पालघर पूर्वेकडील जुना मनोर मार्गाच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम ७ मार्चपासून नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने सुरू केले असतानाच सेंट जॉन महाविद्यालयापासून घोलविराजवळील नाल्यापर्यंत जवळपास ५०० मीटर रस्त्याच्या दोन्ही दिशेचा रस्ता एकाच वेळी खोदला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून याचा त्रास नागरिकांना व विशेष करून विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

पालघर पूर्वेकडे प्रशासनाचे गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत होते. सेंट जॉन महाविद्यालयापासून शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. याबाबत नगर परिषदेकडे अनेकदा तक्रार करण्यात आली. प्रशासन दरवेळी तात्पुरती दुरुस्ती करत होते. मात्र या मार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असल्याने रस्त्याची दुरवस्था कायम राहत होती.

नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने ७ मार्चपासून एक ते दीड किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले. त्यानंतर जवळपास ५०० मीटरपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक एक मीटर साइडपट्टी खोदण्यात आली. हे काम संथ गतीने सुरू असल्याने या मार्गावरून वाहतूक करणारे नागरिक, सेंट जॉन महाविद्यालयासह या मार्गावर असलेल्या चार शाळांच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

अशातच याच भागातील पाचशे मीटरचा रस्ता पूर्ण खोदल्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहनांसाठी हा रस्ता बंद झाला आहे. रस्ता काँक्रीटीकरण करताना एका बाजूने रस्ता खोदून दुसरी दिशा ही वाहनांकरिता खुली ठेवणे आवश्यक असताना ठेकेदाराने एकाच वेळी पूर्ण रस्त्याचे काम सुरू केल्याने या भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नागरिकांची मागणी

पालघर पूर्वेकडील या मार्गावरून दररोज जाणारे हजारो विद्यार्थी, औद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी यांना आता येथून चालण्यासाठीही जागा राहिलेली नाही. प्रकल्पाच्या कामासाठी अनेक मालवाहू गाड्या याच मार्गाने पूर्व पश्चिम प्रवास करतात. रेल्वे स्थानकातून येणारे प्रवासी व विद्यार्थी रिक्षाचा वापर करत असल्याने या मार्गावरून सकाळपासूनच रिक्षांची स्पर्धा सुरू असते. मात्र या कामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.

पूर्वेकडील रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. दोन्ही दिशेने रस्ता खोदल्याबाबत ठेकेदाराशी बोलून एका दिशेने रस्ता मोकळा ठेवण्याच्या सूचना देतो. -विपुल कोरफड, अभियंता नगर परिषद पालघर