कुणाल लाडे
डहाणू : गेल्या काही वर्षांपासून मत्स्य उत्पादनावर संकट कोसळले असताना मासेमारी क्षेत्राचा वाद समुद्रामध्ये पेटून उठला आहे. सौराष्ट्र, दीव बंदरातील तीन बोटी आपल्या सागरी हद्दीमध्ये मासेमारी करत असल्याच्या आरोपाखाली उमरगांव येथील १५० बोटीने या दूरच्या प्रदेशातील बोटीने फिरून उमरगांव बंदरात बळजबरीने आणले. या बोटींवर पोलिस कारवाई करण्याची मागणी सुरू असताना दोन्ही ठिकाणच्या मच्छीमार नेत्यांनी तोडगा काढल्याने परिस्थिती निवळली आहे.
सागरी हद्द तसेच मासेमारी करण्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सौराष्ट्र तसेच दक्षिण गुजरात मच्छीमारांमध्ये संघर्षाचे वातावरण होते. १० डिसेंबर रोजी सौराष्ट्र व दीव भागातील तीन बोटी आपल्या सागरी भागात मासेमारी करत असल्याचे आढळून आल्याने उमरगांव क्षेत्रातील १५० बोटीने एकत्र येऊन या बोटींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना उमरगांव बंदरावर आणले. उमरगांव तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यापासून १० नॉटिकल मैलापर्यंत सौराष्ट्र, जाफराबाद येथील मच्छीमार येत असून येथील मच्छीमारांच्या मासेमारीवर परिणाम होतो तसेच मासेमारांच्या जाळ्यांचे नुकसान होत असल्याचे देखील स्थानिक मच्छीमारांकडून आरोप होत होते.
९ डिसेंबरच्या रात्री सौराष्ट्र भागातील मच्छीमारांनी घुसखोरी केली असताना त्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या उमरगाव येथील बोट मालकांवर दादागिरी केल्याने संबंधित बोटींवर १५० पेक्षा अधिक बोटीने घेराव टाकून त्यांना धारेवर धरले. घुसखोरी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान दोन्ही ठिकाणच्या मच्छीमार नेत्यांनी असे प्रकार घडणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर या बोटीला सोडून देण्यात आले.
हेही वाचा… पालघर: २८ कोटीचा गैरव्यवहार नऊ महिने कारवाईच्या प्रतीक्षेत
वसई, पालघर मधील संघर्षाची आठवण
मासेमारी हद्दीच्या वादावर काही वर्षांपूर्वी वसई व उत्तन तालुक्यातील मच्छीमार यांच्यासोबत उर्वरित पालघर तालुक्यातील मच्छीमारांचा संघर्ष पेटला होता. यावेळी परस्परां विरुद्ध अनेकदा गुन्हे दाखल करण्यात आले होते तसेच घूसखोरी बाबत आंदोलन देखील छेडण्यात आली होती. दक्षिण गुजरात व सौराष्ट्र मधील पेटलेल्या संघर्षाने पालघर जिल्ह्यातील संघर्षाची आठवण करून दिली.
हेही वाचा… पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजपा दावा कायम
उमरगाव तालुक्यातील समुद्री क्षेत्रात सौराष्ट्र मधील दीव, जाफराबाद कडील मासेमार बोटी मासेमारी करत असून त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने मासेमारी केली जात असल्यामुळे स्थानिक मच्छिमारांना अनेक समस्या निर्माण होत आहे. याविषयी स्थानिक मच्छिमारांकडून वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत असून स्थानिक मच्छिमारांनी सौराष्ट्र मधील तीन बोटी ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मच्छीमारांच्या आंतरिक संघर्ष मिटवून घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यावर लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. – स्विटी यतीन भंडारी, सरपंच नारगोल