पालघर : २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. आज १ ऑक्टोबर रोजी या उपक्रमाअंतर्गत ‘एक तारीख एक घंटा स्वच्छतेसाठी’ श्रमदान करण्यासाठी देशाचे पंतप्रधान यांनी आवाहन केले होते. जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम राबवताना पालघर तालुक्यातील स्वच्छ असणाऱ्या शिरगाव किनाऱ्याची निवड केल्याने हा उपक्रम दिखाव्यापूर्वी व छायाचित्र काढण्यापूर्वी मर्यादित राहिला.
पालघर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, समाज कल्याण समिती सभापती मनिषा निमकर, पालघर पंचायत समितीच्या सभापती शैला कोल्हेकर, महिला व बाल कल्याण विभाचे उपमुख्य कार्यकारी प्रविण भावसार, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर, पालघर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नरेद्र रेवंडकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अगंणवाडी सेविका, बचत गट महिला, आरोग्य सेविका कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा – अहमदाबाद पैसेंजरचे इंजिन सुटले अन्…
गणेशोत्सवापूर्वी शिरगावच्या किनाऱ्यावर अतिरिक्त मनुष्यबळाच्या आधारे समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली होती. गणेशोत्सवादरम्यान देखील पालघर तालुक्यातील शहरी भागातील अनेकांनी गणेशाचे विसर्जन शिरगाव येथे केले होते. तसेच समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी जिल्ह्यात असलेले स्वयंचलित यंत्र शिरगाव किनाऱ्यावर कार्यरत असताना या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शिरगाव किनाऱ्याची निवड केली. बहुतांशी स्वच्छ असलेल्या किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवताना विशेष कचरा न मिळाल्याने नंतर उपस्थित मान्यवरांनी व स्वयंसेवकांनी शिरगाव येथील सुरुच्या बागेतील कचरा गोळा करून प्रतिकात्मक दृष्टिकोनातून स्वच्छता मोहीम राबवली.