नितीन बोंबाडे
डहाणू : डहाणू किनारपट्टीवरील गावांना पावसाळय़ापूर्वी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना केली नसल्याने येथील १०० हून अधिक घरांना पुराची भीती कायम आहे. या भागात डहाणू नगर परिषद, स्थानिक प्रशासनाने वाळूने भरलेल्या जंबो बॅग द्याव्यात अशी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
दिवादांडी ते कीर्तना बंगलापर्यंत बंधारादरम्यान ३०० मीटरचा पक्का बंधारा बांधण्याची मागणी आहे. कीर्तने बंगला ते सतीपाडादरम्यान ७०० मीटपर्यंत वारंवार निवेदन देऊनही बंधारा टाकण्यात आलेला नाही. दिवा दांडीचा संरक्षक धूपप्रतिबंधक किनारा खचल्याने मांगेल वाडी, दिवा दांडी, डहाणू खाडी नाका या गावांमध्ये समुद्राचे पाणी शिरते. डहाणू किनाऱ्यावरील गुंग वाडा, वाढवण, डहाणू दुबळपाडा, सतीपडा, नरपड दुबळपाडा, चिखले, हे किनारे अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. भरतीच्या लाटा, त्सुनामी लाटांचा परिणाम किनाऱ्यालगत असणाऱ्या घरांवर होत आहे. धूपप्रतिबंधक किनाऱ्याचे पक्के बांधकाम करावे यासाठी सागरीसुरक्षा तटरक्षक दलाने सरकारकडे वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
डहाणू समुद्रकिनाऱ्यावर परनाका ते दिवादांडीदरम्यान सन २००४-२००५ मध्ये तारेची जाळी, सिमेंटचे चौरस दगड दोरखंडाने बांधलेला कमकुवत बंधारा समुद्राच्या लाटांच्या माऱ्यात नष्ट झाल्याने किनाऱ्यावरील कीर्तना बंगला ते सत्तीपाडा भागात धोका निर्माण झाला आहे. बेकायदा वाळू उपशामुळे सतीपाडा, मांगेलआळी, कीर्तने बंगला येथील समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात आलेला धूपप्रतिबंधक बंधारा धोकादायक बनला आहे. वाळू उपसामुळे धूपप्रतिबंधक बंधारे कमकुवत बनले असून समुद्रकिनाऱ्याची मोठय़ा प्रमाणात धूप होत आहे. परिणामी समुद्राच्या भरतीच्या लाटांचा तडाखा थेट डहाणू किनाऱ्यावरील गावांना बसत असून किनाऱ्यावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे किनाऱ्यावर वाळूने भरलेल्या जंबो बॅग टाकण्याची मागणी डहाणू किनारा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
आश्वासन देऊनही जागा नाही
समुद्राच्या भरतीच्या लाटेने १९९१ ते २००५ दरम्यान कीर्तने बंगला ते सतीपडा येथील ६५ पक्की घरे कोसळल्याची घटना घडली होती. सन २००५ मध्ये शासनाने डहाणू किनारपट्टीवर खाजन जमिनीत बेघर १०५ कुंटुबांना वडकून येथे ३० बाय ३० ची प्लॉट-प्लॅन नकाशा तयार करून १०५ लाभार्थीना प्लॉट देण्याचे आश्वासन दिले होते. किनाऱ्यावरील बेघर झालेल्या कुटुंबांना वडकून येथे प्रस्तावित प्लॉट-प्लॅन योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी होत आहे.
डहाणूचा संरक्षक धूपप्रतिबंधक किनारा खचल्याने समुद्राच्या लाटा थेट किनाऱ्यावर कोसळतात. परिणामी दरवर्षी किनारपट्टीच्या गावांना पुराचा सामाना करावा लागत आहे. शासनदरबारी पत्रव्यवहार करूनही मच्छीमारांच्या पदरात उपेक्षा पडत आहे. -धनेश आकरे, मच्छीमार, डहाणू गाव
किनारपट्टीतील गावांना पुराचा धोका कायम; डहाणूत अद्याप पावसाळय़ापूर्वीची उपाययोजना नसल्यामुळे ग्रामस्थ चिंतेत
डहाणू किनारपट्टीवरील गावांना पावसाळय़ापूर्वी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना केली नसल्याने येथील १०० हून अधिक घरांना पुराची भीती कायम आहे.
Written by नितीन बोंबाडे
First published on: 24-05-2022 at 01:54 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coastal villages at risk flooding villagers worried premonsoon solution dahanu yet amy