डहाणूत वाळू उपशामुळे धूप प्रतिबंधक बंधारे कमकुवत
डहाणू : डहाणूत समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदा वाळू उपशामुळे येथील धूप प्रतिबंधक बंधारे कमकुवत झाले आहे, तर किनाऱ्याची मोठय़ा प्रमाणात धूप होऊ लागल्यामुळे परिसरातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
डहाणू किनाऱ्यावरील सतीपाडा, दुबळपाडा, धाकटी डहाणू, चिंचणी, दिवा दांडी, डहाणू मांगेलवाडा, नरपड मांगेलवाडा, आगर, चिखला समुद्रकिनाऱ्यांवर संध्याकाळी ६.३० वा.पासून पहाटेपर्यंत रेती काढण्यात येते. डहाणू आगार, मल्याण मार्गाने तसेच केनाड मार्गाने पिकअप वाहनातून संध्याकाळ ७.०० पासून सकाळी ७.०० वाजेपर्यंत भरधाव वेगाने बेकायदा रेती वाहतूक सुरू असते. या कामात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून येतो. वाळू उपसामुळे सतीपाडा आणि चिखला येथे तर मोठमोठे खड्डे तयार झालेले दिसत आहेत. सुरुची बाग, बंदर किनाऱ्याची धूप झाली आहे. वाळू उपशामुळे सतीपाडा, मांगेलआळी, कीर्तने बंगला येथील समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या धूप प्रतिबंध बंधारा धोकादायक बनला आहे. समुद्राच्या भरतीच्या लाटांचा तडाखा थेट डहाणू किनाऱ्यावरील गावांना बसत असून पावसाळ्यात यंदाही गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे किनाऱ्यावर वाळूने भरलेल्या जम्बो बॅग टाकण्याची मागणी डहाणू किनाऱ्यावरील रहिवाशांनी केली आहे.
डहाणू गाव, मांगेलं आळी, सतीपाडा येथे राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे किनारे पोखरले जाऊन धोकादायक बनले आहेत, तर पुराच्या लाटांमध्ये घरांना धोका निर्माण झाला आहे.
– धनेश आक्रे, स्थानिक रहिवासी
समुद्रावरील वाळू चोरणे आणि वाहतूक याविरुद्ध खास पथके नेमून कारवाई केली आहे. अनेकदा याविरुद्ध कारवाई केली आहे.
– राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू