जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक ५ ऑक्टोबर रोजी

पालघर : नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणामुळे रद्दबातल ठरलेल्या पालघर जिल्हा परिषदेमधील १५ गटांची तसेच चार तालुक्यांमधील १४ पंचायत समितीमधील गणांमध्ये ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली असून जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार पालघर जिल्ह्यात नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या अंतर्गत आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक असल्यामुळे १५ जिल्हा परिषद गटांतील तसेच चार तालुक्यांतील १४ पंचायत समिती गणांच्या सदस्यांची निवड रद्द ठरवली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली होती. ११ मे २०१० रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घालून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे निर्देशित देण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक घेण्याची तयारी असताना संबंधित जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे तसेच पालघर जिल्हा करोना प्रादुर्भाव स्तर ३ मध्ये असल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नव्हता.

राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला असून घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार १५ सप्टेंबरपासून संकेतस्थळावर उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम मुदत २० सप्टेंबपर्यंत आहे. २१ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी आणि छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत २७ सप्टेंबर रोजी उमेदवारी मागे घेणे तसेच ५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

ज्या नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले आहे, अशा जागांसाठी जिल्हा न्यायाधीश यांनी सुनावणी घेऊन २७ सप्टेंबपर्यंत निकाल द्यावा तसेच या जागांसाठी २९ सप्टेंबपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

निवडणूक होणाऱ्या जागा जिल्हा परिषद गट

उधवा (तलासारी) बोर्डी, कासा, सरावली, वणई (डहाणू) अलोंडे (विक्रमगड) आसे ,पोशेरा (मोखडा) गारगाव, मोज मांडा, पालसई, आबिटघर (वाडा) सावरे- एम्बुर, नंडोरे-देवखोप (पालघर)

पंचायत समिती गण

ओसरविरा, सरावली (डहाणू) सापने बुद्रुक (वाडा) नवापूर, सालवड, सरावली (अवधनगर), सरावली, मान, शिगाव- खुताड, बऱ्हाणपूर, कोंढाणा, नवघर घाटीम (पालघर) भाताणे, तिल्हे (वसई)