डहाणू : वाढवण टिघरेपाडा ग्रामस्थांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून खम्ड्डय़ात गेलेला दोन कि.मी. रस्ता काँक्रीटीकरण करुन बांधला. टिघरेपाडा येथील २५ ते ३० युवकांनी फावडा घेऊन श्रमदानातून हा रस्ता करण्यास योगदान दिले. दरम्यान, शनिवारी चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वाढवण येथे आलेले आमदार श्रीनिवास वनगा यांनी रस्त्यासाठी आमच्याकडूनच अपेक्षा का करतात, असे उत्तर दिल्याने नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
वाढवण तिघरेपाडा हा दोन कि.मी. रस्ता अत्यंत दयनीय आणि खड्डेमय बनल्याने ग्रामस्थ रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करीत आहेत. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वाढवन बंदराची पाहणी करण्यासाठी अनेक नेते, मंत्री वाढवण येथे येतात. मात्र गावातील मूलभूत सुविधांचे आश्वासव देऊन दुर्लक्ष केले. चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे झाले. पावसाळा तोंडावर आला असतानाही प्रशासन, लोकप्रतिनिधी रस्ता दुरुस्तीसाठी लक्ष्य देत नसल्याने ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केली. व रस्त्याची बांधणी करण्यात आली.