लोकसत्ता वार्ताहर
बोईसर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर ते अच्छाड या १२१ किलोमीटर अंतराच्या टप्प्यातील उड्डाणपुलांवर काँक्रीटीकरण करण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूंच्या कठड्यांची उंची कमी होऊन भरधाव वेगातील वाहने पुलाच्या खाली कोसळून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील १२१ किलोमीटर लांबीच्या टप्प्यातील काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात सुरु असून पावसाळयापूर्वी काम पूर्ण करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडून नियोजन आहे. महामार्गावर घोडबंदर ते अच्छाड दरम्यान जवळपास ४० लहान-मोठे पूल आणि उड्डाणपुल आहेत. यामध्ये तानसा, वैतरणा, वांद्री, सूर्या या सारख्या मोठ्या नद्या व इतर लहान नद्यांवर बांधण्यात आलेले पूल वगळता इतर सर्व पुलांवर काँक्रीटीकरण करण्यात आले असून यामुळे पुलांवरील रस्त्याच्या पृष्ठभागाची उंची २०० मिलीमीटर ने वाढली आहे.
काँक्रीटीकरणामुळे रस्त्याच्या पृष्ठभागाची उंची वाढल्याने पुलांवरील दोन्ही बाजूच्या कठड्यांची ८०० मिलीमीटर असलेली उंची कमी होऊन ती ६०० मिलीमीटर झाली आहे. पुलावरील दोन्ही बाजूंच्या कठड्यांची उंची कमी झाल्यामुळे वाहनांच्या अपघाताचा धोका मात्र वाढला आहे. पुलांवरून भरधाव वेगाने ये जा करणारी वाहने चालकाचे नियंत्रण सुटून उंची कमी झालेल्या कठड्यामुळे खालच्या सेवा रस्त्यांवर कोसळून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात रसायनाने भरलेला टंकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मनोर जवळील मस्तान नाका उड्डाणपुलाचा कठडा ओलांडून खालच्या सेवा रस्त्यावर कोसळण्याची घटना घडली. या अपघाताच्या वेळेस खालच्या सेवा रस्त्यावर नागरिक व वाहनांची वर्दळ नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र यानिमित्ताने पुलांवरील कमी उंचीच्या कठड्यांचा प्रश्न रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने ऐरणीवर आला असून संभाव्य अपघात टाळण्यासाठी सर्व उड्डाणपुलावरील कठडे व त्यावरील लोखंडी रेलिंगची उंची वाढवण्याची मागणी होत आहे.
दरम्यान मनोर नांदगाव, मनोर टोकराळे व तलासरी येथे नव्याने उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असून या पुलांचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होण्याची अपेक्षित आहे. नवीन पुलांची उभारणी करताना कठड्याची उंची वाढवण्याच्या दृष्टीने प्रयोजन करण्यात येईल तसेच जुन्याने उभारण्यात आलेल्या कठड्यांवर अतिरिक्त थर बसवणे व रेडियम रिफ्लेक्टर बसवणे गरजेचे झाले आहेत. त्याच बरोबरीने महामार्गावरील सर्व पुलांवर व शहरी भागातील रस्त्यांच्या कडेला ४०० पथदिवे बसवण्याचे नियोजन आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील उड्डाणपुलांवर करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणामुळे कठड्यांची उंची कमी झाली आहे. कठडे आणि लोखंडी रेलिंगची उंची वाढविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. -सुमित कुमार, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठाणे विभाग