लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या १२१ किलोमीटर पट्ट्यातील काँक्रिटीकरण अर्थात वाईट टॉपिंग करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले असून त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यापुढील काँक्रीट करण्याचे टप्पे नियोजित पद्धतीने तसेच पोलीस महामार्ग पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून करण्याच्या सप्तसूचना जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खानिवडे टोल नाक्यापासून वसई पर्यंत दुतर्फा वाईट टॉपिंगचे काम सुरू केल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. असे काम हाती घेताना स्थानिक प्रशासन, पोलीस, महामार्ग पोलीस यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचे या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी यांच्यासमोर स्पष्ट केले. याबद्दल जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत यापुढे नियोजित पद्धतीने काम करण्यासंदर्भात ताकीद दिली. या वाहतूक कोंडीमुळे नाव्हाशेवा बंदराकडे जाणारी अवजड वाहतूक, मुंबई विमानतळाकडे जाणारी प्रवासी वाहतूक तसेच वापी, तारापूर येथून दररोज प्रवास करणाऱ्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागले.
उपलब्ध असलेल्या तीन पैकी फक्त एका मार्गीकेवर काँक्रीटीकरण करण्यात यावे व असे करताना दोन मार्गीका वाहतुकीसाठी खुल्या राहातील याबाबत दक्षता घेण्याचे सांगण्यात आले. काँक्रीटीकरण होणाऱ्या भागातील लागतकच्या इतर दोन मार्गीकेवरील खड्डे बुजवण्यात येऊन काम सुरु असल्याच्या त्यापूर्वीचा पट्ट्यात वाहतुक सुस्थितीत राखण्याच्या दृटीने व्यवस्था करण्यात यावी असे सूचित करण्यात आले. ज्या भागात काम सुरू आहे त्यापूर्वीच्या दुभाजकातील मोकळ्या जागा (मिडीयन कट) बंद करण्यात याव्यात तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्येक १०० मीटरवर अहोरात्र ट्रॅफिक वॉर्डन व देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग पोलीस तैनात असावे असेही निश्चित करण्यात आले. काँक्रिटीकरण सुरू असणाऱ्या कामाच्या ठिकाणी कोणतेही वाहन बंद पडल्यास त्याला तात्काळ हलवण्यासाठी अपेक्षित क्षमतेची क्रेनची सुविधा उपलब्ध ठेवण्यात यावी असेही या बैठकीत सुचित करण्यात आले. संपूर्ण १२१ किलोमीटर पट्ट्यातील कामांच्या आराखड्याला एकत्रीत मंजुरी घेण्याऐवजी प्रत्येक ४०० मीटरच्या पट्ट्यासाठी स्वतंत्र मंजुरी घेण्याच्या यावी असेही ठरविण्यात आले.
आणखी वाचा- तलासरी, डहाणू तालुक्यात पुन्हा भूकंपाचा धक्का
काँक्रिटीकरणाच्या स्वतंत्र पट्ट्यांना नव्याने मंजुरी घेताना सर्व संबंधित विभागाने त्या ठिकाणाची स्थळ पाहणी करावी, लगतच्या मार्गांची स्थिती पडताळून द्यावी, त्यापूर्वी असणाऱ्या दुभाजकांमधील मोकळ्या जागा बंद करण्यात याव्या, पुलालगत असलेल्या सेवा रस्त्यांची डागडुजी करून त्यावरील गतिरोधक काढून टाकण्यात यावे तसेच क्रेन व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत खातरजमा करण्यात यावी असे या बैठकीत ठरवण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीला खासदार राजेंद्र गावित, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय महामार्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दाहिकर, राज्य परिवहन विभागाचे अधिकारी, पालघर वाहतूक शाखेचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार व संबंधित मंडळी उपस्थित होते.
मोऱ्यांचे काम झाल्याशिवाय काँक्रिटीकरण नाही
घोडबंदर ते वसई दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या भागात पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असणाऱ्या मोरया बुजवल्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. या ठिकाणी नव्याने मोऱ्या उभारण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून या मोऱ्यांचे बांधकाम झाल्याशिवाय काँक्रिटीकरण करण्यात येऊ नये अशी खासदार राजेंद्र गावित यांनी या बैठकीत भूमिका घेतली.
आणखी वाचा-डहाणू: पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असमन्वयामुळे पाटाच्या पाणी प्रवाहावर परिणाम
कसे होणार काँक्रिटीकरणाचे काम
१२१ किलोमीटरच्या तीन मार्गिकांचे काँक्रिटीकरण दुतर्फा करण्यासाठी ७२० किलोमीटर मार्गिका क्षेत्रावर १८ महिन्यात काम पूर्ण करावयाचे आहे. हे काँक्रिटीकरण २० किलोमीटरच्या सहा पट्ट्यात करण्यात येत असून १५ जानेवारीपर्यंत काँक्रिटीकरणाचे सहा यंत्र कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक काँक्रिटीकरण यंत्रणेद्वारे दररोज २५० मीटरचे कॉंक्रिटीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यावर १५ ते २१ दिवस पाण्याद्वारे क्युरिंग करणे अपेक्षित आहे. काँक्रिटीकरण करण्यासाठी घोडबंदर, मनोर व आंबोली येथे रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट टाकण्यात आले असून घोडबंदर ते विरार पर्यंतचा पट्टा प्राधान्याने पावसाळापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर हे संपूर्ण काम ३०० दिवसात संपवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मार्गीकेचे विलगीकरण करताना असणाऱ्या साईन बोर्डमुळे अपघात होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिले असून साडेतीन मीटर रुंदीच्या मार्गीकेचे काँक्रिटीकरण करताना किमान साडेसात मीटर खुला मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध व्हावा यासाठी दक्षता घेण्यात येणार आहे. काँक्रिटीकरण करताना सर्वसमावेशक योजना व आराखडा तयार करण्यात येऊन सर्व संबंधित विभागांना सहभागी करून वाहतूक कोंडी रोखण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला.