पालघर जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तिसऱ्या लाटेची भीती

पालघर : पालघरसह राज्यातील ११ जिल्ह्यंमध्ये करोना निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र पालघर जिल्ह्य़ात हे र्निबध केवळ कागदावरच दिसून येत आहे. निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात शासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे अनेक नागरिकांकडून त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती वर्तविण्यात येत आहे.

पालघर जिल्हा गेल्या काही आठवडय़ांपासून करोना निर्बंधाच्या तिसऱ्या स्तरात आहे.  सायंकाळी चार वाजेनंतर दुकाने व इतर आस्थापने बंद करणे अपेक्षित आहे. मात्र पालघर शहरातील काही भाग वगळता जिल्ह्यत अन्य ठिकाणी सायंकाळी सात- आठ वाजेपर्यंत दुकाने राजरोसपणे उघडी असल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे दुकानातील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी किंवा लसीकरण केल्याचे प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे जिल्हा प्रशासनाने नियोजित केले असले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

नागरिकांकडून सामाजिक अंतर व इतर नियमांचे पालन करावे, मुखपट्टी परिधान कराव्यात, दुकानांमध्ये निवडक संख्येने प्रवेश घ्यावा किंवा रांगेचा वापर करून गर्दीच्या ठिकाणी खरेदी करावी, अशा संकेतांचेदेखील सर्रास उल्लंघन होताना दिसते. शासकीय कार्यालयांमध्ये बिल भरणा केंद्रांमध्येदेखील गर्दी उफाळून येते.

रिक्षामध्ये ५० टक्के आसन क्षमतेने प्रवासी संख्या वाहून नेण्याचे निर्बंध असताना प्रत्यक्षात सहा आसनी रिक्षांमध्ये आठ ते दहा प्रवासी कोंबून भरून नेले जातात.

आठवडा बाजारांच्या आयोजनावर र्निबध असताना त्याचे सर्रास उल्लंघन होत  आहे. पोलीस, महसूल विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दाखवण्यात येणाऱ्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्याची ही जणू कृती सुरू आहे, असे निर्बंध पाळणाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

आठवडय़ाला ८०० रुग्ण

पालघर जिल्ह्यात आठवडय़ाला किमान पाचशे ते आठशे नवीन रुग्ण आढळले जात असून शासकीय समर्पिता करोना रुग्णालय व करोना उपचार केंद्रांमध्ये ५० ते ६० टक्के क्षमतेने रुग्ण अजूनही दाखल आहेत. जिल्ह्यात सातत्याने करोना मृत्यू नोंदवले जात असून नागरिकांमध्ये निर्माण झालेली बेफिकिरीमुळे रुग्णवाढ पुन्हा उफाळून येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.