|| नीरज राऊत
जिल्ह्यात पात्र २३ लाख नागरिकांपैकी केवळ साडेपाच लाख जणांचे लसीकरण
पालघर : पालघर जिल्ह्यातील ३८.७२ लाख लोकसंख्या आहे. त्यापैकी २३ लाख ५४ हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. आजवर जेमतेम चार लाख ७४ हजार नागरिकांना लसीकरणाची पहिली मात्रा तर एक लाख सात हजार नागरिकांना लसीकरणाची दुसऱ्या मात्रेचा लाभ मिळाला आहे. हे प्रमाण जेमतेम १० टक्के असून जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळत नसल्याने लसीकरण मोहिमेवर त्याचा परिणाम होत आहे.
करोनाच्या दुसऱ्याला लाटेमध्ये पालघर जिल्ह्यात एकंदर ७२ हजार ४९८ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर एक हजार ४०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर १.९ टक्के इतका असताना तसेच आठवडा सरासरी रुग्णवाढ दरामध्ये जिल्हा आठव्या स्थानावर असताना जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळत नसल्याने प्रशासकीय चिंता वाढली आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांची २१.०९ लाख तर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राची १७.६३ लाख लोकसंख्या असल्याचे अंदाजित आहे. त्यापैकी २३ लाख ५४ हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र असून पात्र लाभार्थ्यांपैकी २० टक्के नागरिकांना लसीची पहिली मात्रा, तर अवघ्या साडेचार टक्के नागरिकांना दुसरी मात्रा प्राप्त झाली आहे. याखेरीज खासगी रुग्णालयांमार्फत ३३ हजार लस मात्रा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना देण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात तीन उपजिल्हा रुग्णालय, नऊ ग्रामीण रुग्णालय, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र व २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दररोज ३०० ते ५०० लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याची क्षमता आहे. हे पाहता जिल्ह्यासाठी दररोज किमान ४० हजार लसीकरण मात्रांची आवश्यकता असताना लस उपलब्धतेच्या अनुशंघाने जेमतेम साडेचार ते पाच हजार लसीकरण केले जात आहे.
मुंबईलगत असलेल्या या जिल्ह्यातील अनेक नागरिक कामानिमित्त शहरी भागात ये-जा करतात. तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, कामगार वर्गदेखील मुंबई, ठाणे, नाशिक येथून ग्रामीण भागात वावर करीत असतो. रुग्णवाढ आणि मृत्युदर अन् संसर्ग झालेल्या रुग्णांची आकडेवारी पाहता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पालघर जिल्ह्याला लस उपलब्धतेबाबत राज्य सरकारकडून दुजाभाव केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच पालकमंत्री यांच्यामार्फत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे.
१६ जानेवारी २०१९ रोजी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करणाऱ्या पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात अजूनपर्यंत जेमतेम १९०९० लस पुरवठा झाला आहे, तर दोन लसीकरण केंद्र चालवणाऱ्या टिमा रुग्णालय केंद्रात अजूनपर्यंत २० हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पालघर व बोईसर या दोन्ही शहरांभोवती एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असताना लशीच्या मात्रेची उपलब्धता कमी असल्याने या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या असणाऱ्या शहरांकडे लसीकरणाबाबत जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात पालघर शहरातील नऊ लसीकरण केंद्रांसाठी जेमतेम सात हजार ८०० लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पालघर व बोईसरप्रमाणे करोना संसर्ग असणाऱ्या डहाणू केंद्रावर १२ हजार ७३४ तर वाडा येथे दोन हजार २२१ लसीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चिंचणी, सातपाटी, जव्हार, केळवे-माहीम या मोठ्या व महत्त्वाच्या गावांमध्येदेखील जेमतेम सहा ते सात हजार लसीकरण आजवर झाले आहे. विशेष म्हणजे या आकडेवारीत शासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांचादेखील समावेश आहे.
जिल्हा कार्यालयाकडून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जात नसल्याची कैफियत पालघर नगर परिषदेचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मांडली आहे.
साडेआठ लाखांत १४७०१ नागरिकांची लसीकरण
पालघर नगर परिषदेने करोना लसीकरणासाठी शहरात आठ केंद्र उभारली असून त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचारी व त्यांची नेमणूक करून इतर साहित्य उपलब्ध करून दिले होते. नगर परिषदेने १२ एप्रिलपासून सुरू केलेल्या या लसीकरण केंद्रात ९ जून पर्यंतच्या ५९ दिवसांपैकी फक्त २५ दिवस लस उपलब्ध झाली असून या कालावधीत १४ हजार ७०१ नागरिकांना लस देण्यात आली. विशेष म्हणजे सर्व लसीकरण केंद्र चालविण्यासाठी नगर परिषदेने आठ लाख ४४ हजार ५०० रुपये इतका खर्च केला आहे.