दुसऱ्या मात्रेसाठी पहाटे तीन वाजल्यापासून केंद्रांवर रांगा
पालघर : काही दिवसांच्या खंडानंतर पालघर जिल्ह्यााला करोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली असून मंगळवारपासून जिल्ह्याात १२ ठिकाणच्या केंद्रावर दुसऱ्या लसीच्या मात्रेसाठी लसीकरण हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्याातील सर्वच केंद्रांवर दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र ठरलेल्या नागरिकांची गर्दी उसळली.
गेल्या काही दिवसांपासून लशीचा तुटवडा असल्याने अनेक केंद्रांमधील लसीकरण बंद होते. जिल्ह्याातील १२ ठिकाणच्या केंद्रावर मंगळवारी लसीकरणासाठी शिबिर घेण्यात आली. जिल्ह्याात ३३०० नागरिकांना दुसऱ्या मात्रेचे लसीकरण करण्याची योजना (वॉल्क- इन पद्धतीने) आखण्यात आली होती. या बाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने रविवार सायंकाळी प्रकाशित केल्याने लसीकरण केंद्राबाहेर पहाटेपासून अभूतपूर्व गर्दी जमली.
केंद्रांमध्ये रविवार व सोमवारी काही नागरिकांनी आपल्या नावांची आगाऊ नोंदणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामुळे लसीकरण प्रक्रियेत गैरव्यवहार होण्याची शक्यता होती. त्यामुळे आधारकार्डासह रांगेत उभे राहील त्याच नागरिकांना लसीकरणाचे टोकन दिले जाईल, असे आरोग्य विभागाने रात्रीच स्पष्ट केले होते. त्यामुळे पहाटे अडीच तीन वाजल्यापासून अनेक केंद्रांत बाहेर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.
पालघर येथे अभूतपूर्व गर्दी
पालघर येथील भगिनी समाज शाळेच्या आवारात असलेल्या शासकीय लसीकरण केंद्रामध्ये दुसरी लस घेणाऱ्यांसाठी ५०० लशींची उपलब्धता होती. याठिकाणी पहाटे तीन वाजल्यापासून नागरिक रांगेत होते. पहाटे पावणेपाच वाजता आलेल्या नागरिकाला २७५ वा क्रमांक मिळाला. रांगेत काही तास उभे राहून आपला क्रमांक लागेल म्हणून प्रतीक्षेत असलेले किमान पाचशे नागरिक रिकाम्या हाती परतले.
लसीकरणासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक व वृद्धांनादेखील रांगेत उभे राहणे आवश्यक झाले होते. काही ज्येष्ठ मंडळींच्या ऐवजी तरुणांनी त्यांचा टोकन घेण्यासाठी रांगेत राहणे पसंत केले. येत्या आठवड्यात पालघर जिल्ह्याात अधिकतर प्रमाणात दुसऱ्या मात्रेकरिता पात्र नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे १८ ते ४४ तसेच ४५ वरील वयोगटातील पहिल्या लशीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना काही दिवस वाट पहावी लागणार आहे.