वसई-विरार परिसरात गोंधळ कायम
विरार : वसई-विरार परिसरात लसीकरणाचा गोंधळ थांबताना दिसत नाही आहे. मुळात लशींचा मोठा तुटवडा असताना पालिका ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने लसीकरण मोहीम राबवत आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर दोन्ही प्रकारच्या नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण २२ लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड लशीचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाकडून ४६०० कोव्हिशिल्ड आणि २०० कोव्हॅक्सिनचा साठा महापालिकेला उपलब्ध झाला आहे. मागील आठवड्यात चार दिवस पालिकेचे लसीकरण बंद होते. यामुळे मागच्या आठवड्यात नोंदणी केलेल्या आणि नव्याने नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची एकच गर्दी उसळत आहे. नागरिकांना ऑनलाइन सत्र उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात केंद्रावर गर्दी केली जाते. १०० ते १२५ मात्रांसाठी ३०० ते ४०० नागरिक केंद्रावर मध्यरात्री येत आहेत.
विरार पूर्वमधील रानळे तलाव येथील पालिका प्राथमिक आरोग्य केंद्रावर बुधवारी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पहाटे चार वाजल्यापासून या केंद्रावर नागरिकांनी लशीसाठी रांगा लावल्या होत्या. लशीसाठी आलेल्या साया नवलकर यांनी सांगितले की त्या मागील चार दिवसापासून या केंद्रावर येत आहेत. पण त्यांचे नाव घेतले जात नाही. त्यांना केवळ उद्या या असे सांगितले जाते. तर ऑनलाइन नोंदणी केलेल्या मेरी जयराज यांनी सांगितले की पहाटे ४ वाजल्यापासून त्या सायंकाळी ४ पर्यंत आपल्या पतीसोबत रांगेत उभ्या होत्या आणि नंतर त्यांना लस उपलब्ध दिल्याचे सांगितले आणि घरी पाठवले. ज्येष्ठ नागरिक पांडुरंग खैरे हे दुसऱ्या मात्रेसाठी आले होते. पहाटेपासून रांगेत असताना त्यांना दुपारी सांगण्यात आले की, मागील आठवड्यातील ३ तारखेचे टोकन वाटले जात आहे त्यामुळे त्यांनी घरी जावे. शांताराम कदम यांनी माहिती दिली की, बसण्याची वा पाण्याची कोणतीही सुविधा या केंद्रावर नाही, ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
नोंदणी करुनही लस नाही
नालासोपारा पश्चिाम पाटणकर पार्क येथील लसीकरण केंद्रावर पहाटेपासून लोकांनी रांगा लावल्या असताना केवळ २० ते २५ लोकांचे लसीकरण करून घेतले जात होते. कारण लशींचा पुरवठा कमी होता. यातील महेश पांचाल यांनी माहिती दिली की, त्यांचे ऑनलाइन नोंदणी होऊनही केवळ लस उपलब्ध न झाल्याने त्यांना घरी जावे लागले. पालिका सध्या टोकन पद्धतीचा वापर करत आहे. असे असतानाही केवळ लशींचा पुरवठा जर केंद्राला माहीत नसेल तर अधिक टोकन देऊन नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.