‘जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने करोना नियत्रंणात’; स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री दादाजी भुसे यांचे प्रतिपादन
पालघर: करोनाच्या तिसरा लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या केंद्रांची क्षमता वाढवण्यात आली असून प्राणवायूचा पुरेसा पुरवठा उपलब्ध राहील यासाठी व्यवस्थापन करण्यात आले आहे. याशिवाय बालरोगतज्ज्ञ व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून पालघर जिल्हा करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाल्याचे पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वातंत्र्यदिनी प्रतिपादन केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयांच्या प्रागणांत मुख्य शासकीय ध्वजारोहण कृषी, माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन तसेच वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
जिल्ह्यातील लसीकरणाने आठ लाखांचा टप्पा ओलांडला असून जवळपास २५ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आले आहेत. जिल्ह्र्थ्यांयातील कुपोषण, बालमृत्यू,मातामृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी तपासणी शिबिरे व इतर योजना राबवीत असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई पीक पाहणी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला असून या योजनेमुळे सहकाऱ्यांना स्वत: पीक पाण्याची नोंदणी करणे शक्य होणार आहे. पालघर या कृषी प्रधान जिल्ह्यात रानभाज्यांचे विशेष महत्त्व असून जिल्ह्यातील वारली संस्कृती जपण्यासोबत रोजगार हमी योजनेअंतर्गत फळ पिकांचे क्षेत्रफळ वाढविण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातून ताजी फळे, भाजीपाला, फुले, रोपे, कलमे इत्यादी मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून त्यामध्ये चिकू या जिल्ह्यातील फळाचा समावेश झाला आहे. आंबा, द्राक्ष, डाळिंब, केळी, चिकू या फळांसोबत भाजीपालामध्ये भेंडी, दुधीभोपळा, मिरची, कारले, कढीपत्ता, आळू, पडवळ, वांगी, गवार, कांदा इत्यादींचा निर्यात यादीत समावेश असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणे यासाठी २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
पालकमंत्री यांच्या हस्ते वाडा तालुक्यातील शेल्टे येथील प्रसंगावधान दाखवून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविणाऱ्या शेलटे गावचे सरपंच व ग्रामस्थ तसेच सफाळे येथील पूरपरिस्थितीत बचावकार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
‘अब्दुल कलाम फाऊंडेशन’अंतर्गत निवड झालेल्या तलासरी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी, तालुकास्तरीय, ग्रामीणस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचाही यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या घटकांचे तालुका, क्लस्टर व ग्रामपंचायत स्तरावर तसेच कर्ज देणाऱ्या संस्थांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला.