लोकसत्ता वार्ताहर
डहाणू : मुलगा, पुतण्या आणि भाच्यामध्ये झालेल्या किरकोळ वादात चुलत मामाने भाच्याचा खून केल्याची धक्कादायक घटना तलासरी तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील मुख्य आरोपीने यापूर्वी आपल्या पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात कारावास भोगला असून त्याने भाच्याचा खून अगदी शिताफीने केल्याचे समोर आले आहे.
तलासरी तालुक्यातील झरी फोंडा पाडा येथील देवराम रघ्या जवलिया ३० हा आपल्या वडिलांसह मुंबई येथे मासेमारी बोटीवर काम करत असून काही दिवसांसाठी आपल्या घरी आला होता. दरम्यान चुलत मामाची मुले प्रदीप खरपडे ३१ आणि विकास खरपडे वय २३ यांच्यासह शनिवारी दुपारी ३ वाजता घरातून बाहेर गेला असून रात्री ८ वाजता घरी परतला. त्यांनतर देवराम याने वाहन जोरात चालवल्याच्या मुद्द्यावरून तिघांमध्ये वाद होऊन झटापटी सुरू होती. दरम्यान प्रदीपचे वडील चंदू खरपडे ५३ याने मागून येऊन देवरामच्या मानेवर चाकूने वार केला. याविषयी आरडाओरडा झाल्यानंतर परिसरातील लोकांनी जखमीला तलासरी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी देवरामला मयत घोषित केले.
याविषयी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा जंगलात पळून गेलेल्या चंदू खरपडे या सराईत गुन्हेगारासह दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता. त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.